पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांनी लिहिलेल्या लेखाप्रमाणे व्यक्तीचे अनेकविध संबंध असतात. कुटुंबापासून ते संबंध वाढत वाढत विश्वापर्यंत जातात. मात्र सध्या तरी जगभर राष्ट्रवादाचे संबंध अनुल्लंघनीय आहेत. राष्ट्र-राज्य ही संकल्पना कोणालाही टाळता येणार नाही. आधुनिकताविरोध म्हणजे राष्ट्रवाद संकल्पनेला विरोध ही कल्पना अयोग्य ठरेल. अशा स्थितीत पॅन इस्लामीझम ही राष्ट्रवादापलीकडे जाणारी व मिल्लतचा आधार मानणारी कल्पना अवास्तव ठरते. आज जगात जी पन्नासपेक्षा अधिक मुस्लिम राष्ट्रे आहेत ती काही वेळा एकत्र येत असली तरी त्यांपैकी कोणीही आपला राष्ट्रवाद सोडलेला नाही. किंबहुना इराण-इराक, इजिप्त-सीरिया, जॉर्डन-अफगाणिस्तान-पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्रांतील झगडे, राष्ट्रवाद किती प्रबळ आहे हेच दाखवितात. म्हणूनच हमीद दलवाई हे भारतीय राष्ट्रवादाशी संपूर्ण निष्ठा ठेवून तो राष्ट्रवाद बलवान करण्याचा प्रयत्न करीत राहिले व मुस्लिम समाजाने त्या राष्ट्रवादाची कास धरावी असा त्यांचा आग्रह राहिला.

 हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजापुढे जे प्रश्न उपस्थित केले ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुस्लिम मनाने अकबर व दाराशिकोह या संमिश्र संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांपेक्षा औरंगजेबाला अधिक महत्त्व का दिले? बॅ. जीना हे परंपरागत धर्मवादी नसतानाही त्यांच्या मुस्लिम धर्म-जमातवादावर भाळून मौलाना आझादांसारख्या प्रकांड पंडिताला मुस्लिम समाजाने का डावलले? असाही प्रश्न उपस्थित करता येईल की, संत कबीर, सावित्रीबाई फुले यांची सहकारी व पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख, परमवीर चक्राचे मानकरी अब्दुल हमीद, डॉ. झाकीर हुसेन, न्या. छागला, न्या. हिदायतुल्ला यांची मुस्लिम समाजाने उपेक्षा का केली? इराणच्या खोमेनीला, अफगाणिस्तानमधील तालिबानला व दहशतवादी लादेनला का पाठिंबा दिला? तालिबानचा पराभव होताच अफगाणिस्तानमध्ये जो विजयोत्सव, विशेषतः स्त्रियांकडून केला गेला तो विसरून कसे चालेल? वास्तविक अनेक ख्रिस्ती व बौद्ध राष्ट्र असताना त्यांच्या धर्माधिष्ठित राष्ट्रसंघटना नाहीत. मग 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज' (ओआयसी) का बरे निर्माण होते? गेल्या वर्षी अफगाणिस्तानला व १९७१ ला बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान या झगड्यात पाकिस्तानला सहानुभूती का बरे दाखवली गेली? उत्पत्तिशास्त्र, उत्क्रांतिशास्त्र, सात स्वर्गांच्या कल्पना, चंद्राबाबतची मिथके, पृथ्वीकेंद्रित अवकाशशास्त्र या कल्पना आधुनिक विज्ञानाने कालविसंगत ठरविल्यावरही मुस्लिम मन अजूनही त्या कल्पनांभोवती का बरे घोटाळत राहते? याउलट हमीद दलवाई यांनी स्त्रीविषयक नोकरी, तलाक, शिक्षण, पडदा, पोटगी, कुटुंबनियोजन आदी प्रश्न उपस्थित केले. उर्दू भाषेच्या अट्टाहासापायी मुस्लिम तरुणांना नोकरीला वंचित राहावे लागते, त्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. उर्दू भाषा धार्मिक समाजाची भाषा बनवणे व प्रादेशिक भाषांची उपेक्षा करणे याला त्यांचा प्रखर विरोध होता. त्याला ते अलगतावादी व तरुणांचे नुकसान करणारे कृत्य मानीत. बहुसंख्य समाजाकडून मुस्लिम तरुणांना जो दुजाभाव दाखविला जातो, त्याबद्दल सवाल निर्माण करताना ते कधीही कचरले नाहीत. आज मुस्लिम समाज मागासलेला आहे, कारण त्यातील अशरफ फक्त दोन टक्के आहेत. उलट ९७% असलेल्या अजलफ या परंपरागत धंदे करणाऱ्या समाजाची जागतिकीकरणामुळे पूर्ण उपेक्षा होत आहे व त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम अशरफ समाज करीत नाही. एक टक्का असलेला हीन-दीन स्थितीतला

१२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान