पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


निर्माण झालेला आहे. फ्रूट सॅलडमध्ये प्रत्येक फळाची वेगळी चव राहूनही सर्व मिळून एक संमिश्र स्वादिष्ट रस तयार होतो. याला काहीजण 'इंद्रधनुष्य सिद्धांत' ही म्हणतात. हमीद दलवाई यांच्या मते अशा त-हेचे आधुनिक पद्धतीने राष्ट्रीय ऐक्य तयार व्हावे असे होते.
 या प्रबोधनासाठी विवेकनिष्ठ आचाराची गरज आहे. त्याबरोबरच वैज्ञानिकतेचा आधार आचाराच्या बुडाशी असावा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे म्हणणाऱ्या कोपर्निकस, गॅलिलिओ आदी शास्त्रज्ञांचा युरोपमध्ये छळ झाला, कारण त्यांचे संशोधन बायबलविरोधी मानले गेले. सृष्टीच्या व्युत्पत्तीचे सिद्धांत पुराण, कुराण व बायबल येथे ईश्वरी अस्तित्व गृहीत धरून आलेले आहेत. परंतु आधुनिक विज्ञान असे उत्पत्तिशास्त्र मान्य करीत नसतानाही कट्टरवादी व मूलतत्त्ववादी मात्र अट्टाहासाने शब्दप्रामाण्याची कास धरतात. शब्दप्रामाण्याऐवजी प्रयोगशीलतेचा आधार प्रबोधनासाठी आवश्यक आहे. इतिहास, परंपरा आदींबाबतची विचक्षण वृत्ती हे प्रबोधन घडवते आणि आत्मटीकेमुळे ते काम अधिक सोपे होते. आत्मटीकेबरोबरच धर्मचिकित्सा तितकीच महत्त्वाची आहे. जोपर्यंत मानवाला पूर्ण अधिकार दिला जात नाही व त्याचे भाग्य शब्दप्रामाण्याच्या खुंटीवर अडकविले जाते, तोपर्यंत धर्मचिकित्सा अवघड आहे याचा विचार आधुनिक मनाने करण्याची गरज आहे.
 हमीद दलवाई यांच्या मते मुस्लिम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबर साहेबांनी जो प्रयोग केला त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लिम मन बनते ते धर्मसुधारणेस व समाज प्रबोधनास कसे तयार होणार? हमीद दलवाई यांचे वैशिष्टय बरोबर या ठिकाणी आहे. मुस्लिम मन या शब्दप्रामाण्यातून व धर्मांधतेतून मुक्त व्हावे असा त्यांचा अत्यंत निकराचा प्रयत्न होता. असा प्रयत्न यापूर्वी कोणी केल्याचे अजिबात दाखविता येणार नाही. परंपरागत चौकटीत जुजबी बदल सुचविण्याचे धाडस अनेकांनी केले. परंतु 'मूले कुठारः' ही भूमिका मात्र हमीद दलवाईंनी घेतली हे मान्यच करावे लागेल.

 आज जगभर पाश्चात्त्यांच्या विरोधात अनेक कारणांमुळे आक्रोश केला जात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीची निखळ व्यक्तिकेंद्री भूमिका, पाश्चात्त्यांनी लादलेला साम्राज्यवाद आणि चुकीच्या अर्थव्यवस्थेतून जगाची केलेली लूटमार ही त्यामागील कारणे आहेत. पाश्चात्त्यांनी आधुनिकतावाद मांडल्यामुळे आधुनिकतेलाही विरोध केला जात आहे. आधुनिकोत्तर विचारसरणी निर्माण झालेली असून त्याला कित्येकजण 'उत्तर आधुनिकतावाद' असेही म्हणतात. आधुतिकतेला विरोध म्हणजे पुनरुज्जीवनवाद नव्हे व परंपरावाद नव्हे हे प्रथम ध्यानी ठेवले पाहिजे. उत्तर आधुनिकतावाद हा समरसतावाद विरोधी, केंद्रीकरण विरोधी व परिपूर्ण दर्शनवाद विरोधी आहे हे विसरून भागणार नाही. सध्या जे पुनरुज्जीवनवादी व मूलतत्त्ववादी आधुनिकतेला विरोध करीत आहेत, तो विरोध मूलत: मानवविरोधी आहे. उत्तर आधुनिकतावादामध्ये राष्ट्रांतर्गत अनेकविध जाणिवांना महत्त्व देण्यात आलेले आहे. मात्र याचा अर्थ राष्ट्रवाद निरर्थक ठरला असे म्हणून भागणार नाही. अलीकडेच श्री. आंद्रे बेतेले

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/११