पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्जाल समाज तर पूर्णपणे उपेक्षितच आहे. अन्य मागासवर्गीय मुस्लिमांनी सध्या संघटित होण्याचा चंग बांधलेला आहे. परंतु प्रस्थापित नेतृत्वाला असे संघटित होणे मान्य नाही. मंडल आयोगाला संघपरिवाराने ज्या पद्धतीने विरोध केला तसाच विरोध मुस्लिम समाजातही धार्मिक ऐक्याच्या नावाखाली होत आहे. हमीद दलवाई यांच्या मते मुस्लिम समाजाने आपल्या कोषातून बाहेर पडून या दैनंदिन प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. श्रमिकांच्या चळवळीत सामील होऊन आर्थिक व सामाजिक समतेसाठी व सामाजिक न्यायासाठी संघर्ष केले पाहिजेत अशी दलवाई यांची अपेक्षा होती. मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात यावे याचा अर्थ हिंदू धर्माच्या प्रवाहात गौणत्वाची भूमिका घेऊन सामील व्हावे असा नाही, असे दलवाई सतत सांगत. भारतातील मुख्य प्रवाह लोकशाही समाजवादी चळवळ हा व्हावा आणि त्या प्रवाहात न्यायासाठी लढताना मुस्लिम समाजाने इस्लामच्या समतेच्या मूल्याची भर भारतीय संस्कृतीत घालावी अशी त्यांची भूमिका होती.

 स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर राजकारणावर-प्रामुख्याने मुस्लिम राजकारणावर हमीद दलवाई यांनी लिखाण केले आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्यपूर्व मुस्लिम राजकारण बॅ. जीना यांनी व्यापलेले होते. पाकिस्ताननिर्मिती व त्यासाठीचे सर्व डावपेच, प्रत्यक्ष कृती, ओलीस सिद्धांत यात बहुसंख्य मुस्लिमांचे मन पूर्णपणे अडकून गेले होते. आजही बॅ. जीना यांनी भारतीय राजकारणात केलेल्या घोडचुका मुस्लिम मनाने समजून घेतल्या असतील असे मानायला फारशी जागा नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही मुस्लिम समाजासाठीच निर्माण झालेल्या पक्षाचा अगर संस्थांचा तो आश्रय घेताना दिसून येतो. मतदानाच्या वेळी काँग्रेस, समाजवादी पक्ष अगर बहुजन समाजवादी पक्ष यांच्यासारख्या, हिंदू जातीयवादी भाजपला पराभूत करू शकणाऱ्या, पक्षाला त्या त्या वेळी मतदान करतो, मात्र मोठ्या संख्येने बिगर मुस्लिम पक्षात तो दिसत नाही. मुस्लिम संस्थांमध्ये बहुसंख्य संस्था अत्यंत कट्टरतावादी वा अलगतावादी असल्याचे दिसून येते. त्यामध्ये जमाते इस्लामी, जमाते तुलबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, अखिल भारतीय मुस्लिम कायदा बोर्ड, तबलीग जमात, मुस्लिम लीग, इत्तेहादुल मुस्लेमीन, तामीरे मिल्लत, मशावरत, मुस्लिम मजलीस इत्यादी राजकीय व धार्मिक संघटना अत्यंत कट्टरतावादी आहेत. जमाते उलेमा ही संघटना स्वातंत्र्यकाळात काँग्रेसबरोबर होती, परंतु सध्या तिच्यात व जमाते इस्लामीमध्ये फारसा फरक आढळत नाही. हमीद दलवाई यांनी तथाकथित राष्ट्रीय मुस्लिम व कम्युनिस्ट मुस्लिम यांची चांगलीच खिल्ली उडवलेली आहे. त्यांचे राजकारण अखेरीस कट्टरतावादाकडे जाते, कट्टरतावाद्यांच्या मूळ धार्मिक बैठकीत त्यांचा कसा मिलाफ होतो, हे त्यांनी घणाघाती पद्धतीने मांडलेले आहे. अखेरीस न्या. छागला, प्रो. हबीब, प्रो. रशिदुद्दीन खान, डॉ. झकेरिया व ए. ए. ए. फैजी यांसारख्या उदारमतवदी व धर्मनिरपेक्ष मुस्लिम नेत्यांकडे मुस्लिम समाज ढुंकूनही पाहात नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हमीद दलवाई पुन्हा पुन्हा असे मांडतात की 'मुस्लिम समाजात गांधींसारखी मानवतावादी व्यक्ती कोण आहे? मी त्याच्या शोधात आहे.' मुस्लिम समाजात पंडित नेहरूंसारखे स्वतःच्या सांस्कृतिक परिघापलीकडे जाणारे व्यक्तित्व निर्माण होत नाही, याचा त्यांना विषाद वाटतो. 'गमख्वार हमारे कायदेआझम, गांधीकी पर्वा कौन करे' अशी भूमिका मुस्लिम मनोमनात

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/१३