पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 फाळणी होणार हे लक्षात येताच भारतीय मुसलमानांना आपल्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली आणि आजवरच्या राजकारणाच्या चुकलेल्या दिशेची त्यांना जाणीव झाली असे अनेक राजकीय भाष्यकारांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत लेखकाला ही जाणीव फाळणीच्या वेळी मुस्लिम समाजाला झाल्याचा दाखला कुठेही आढळलेला नाही. जिथे प्रचंड दंगली झाल्या अशा उत्तरेतील पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेशचा उत्तर विभाग येथे फाळणीच्या मागणीचे वैयर्थ्य कदाचित मुस्लिम समाजाला जाणवले असेल. इतरत्र भारतातील मुसलमान पाकिस्तान मिळाल्याचा विजयोत्सव बेभानपणे साजरा करण्यात मश्गुल झाले होते. 'हँसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान' ही घोषणा याच काळात मुस्लिम समाजात लोकप्रिय झालेली होती. (युसुफ आझाद कव्वाल - “गमख्वार हमारे कायदेआझम, गांधीकी पर्वा कौन करें" ही कव्वाली फाळणीनंतरदेखील अनेक ठिकाणी म्हणाले आहेत आणि हजारो मुसलमानांनी टाळ्या वाजवल्या आहेत.) मनाने ते मुसलमान तेव्हा पाकिस्तानमय झालेले होते. बहुसंख्यांक मुस्लिम प्रदेशातून ते मानसिकदृष्ट्या अलग होऊच शकलेले नाहीत. पाकिस्तानच्या इच्छा-आकांक्षा, पाकिस्तानचे यश आणि पाकिस्तानची उद्दिष्टे यांच्याशी ते मनाने पूर्वीइतकेच समरस राहिले. एका प्रकारे हे स्वाभाविकच होते. वेगळ्या धर्मराष्ट्रवादावर आधारलेल्या निष्ठा १५ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री भारतीय झेंड्याला प्रणाम केल्याने आणि 'जय हिंद' च्या घोषणा केल्याने बदलल्या जातील असे कोणी मानीतही नाही.

 परंतु खरा प्रश्न तो नव्हता. खरा प्रश्न आपले अल्पसंख्यांक हे स्थान मान्य करण्याचा आणि वस्तुस्थितीला सामोरे जाण्याचा होता. मुस्लिम समाजाच्या स्वत:चे संरक्षण आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्याच्या कल्पना जगातील इतर अल्पसंख्य समाजाच्या कल्पनांपेक्षा और होत्या. इतर समाजांप्रमाणे बहुसंख्यांक समाजाच्या बरोबर त्याने सदिच्छेने राजकीय तडजोड केलेली आहे. जेथे मुसलमान बहुसंख्यांक होते अशा प्रदेशातील मुसलमानांबरोबर तडजोड केलेली आहे. माझे हे विधान अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे. याकरिता इतिहासात थोडे मागे जावे लागेल. १९४० पर्यंत मुस्लिम लीगच्या आणि मुसलमानांच्या ज्या मागण्या होत्या त्या हिंदूंबरोबर करार करण्याच्या स्वरूपाच्या होत्या. १९४० ला पाकिस्तानची मागणी आली. ही मागणी बहुसंख्यांक मुस्लिम प्रदेशातील मुसलमानांचे प्रश्न सोडविण्यापुरती प्रादेशिक अर्थाने मर्यादित बनली. त्या क्षणी मुसलमान जेथे अल्पसंख्यांक होते अशा प्रदेशातील मुसलमानांनी फाळणीच्या मागणीला विरोध करायला हवा होता. कारण फाळणीच्या तडजोडीतून सर्व मुसलमानांच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नव्हती. मग भारतीय मुसलमानांनी जणू आपणच ह्या नवजात मुस्लिम राष्ट्राचे नागरिक बनणार आहोत अशा भावनेने पाकिस्तानच्या मागणीला शेवटपर्यंत पाठिंबा का दिला? अल्पसंख्यांक प्रांतातील कोणताही मुस्लिम नेता १९४७ पर्यंत हा प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही. किंबहुना अल्पसंख्यांक प्रांतातील मुसलमानांनी फाळणीच्या मार्गात पुढाकार घेतलेला दिसतो. याचा संबंध भावनात्मकदृष्ट्या अल्पसंख्यांक हे स्थान नाकारण्याच्या मुस्लिम मनोवृत्तीशी आहे. हे स्थान नाकारण्यासाठी फाळणीच्या मागे धावल्यानंतर ते अधिक अल्पसंख्यांक म्हणून भारतात

भारतीय मुसलमान /१२३