पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे(१९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर डाक्याला दिलेल्या भेटीत श्री. आयूबखान म्हणाले, “भारताएवढे आमचे सैन्य मोठे असते तर आम्ही काय चमत्कार केले असते हे मी आपणास सांगू इच्छितो." अर्थ असा की एवढे मोठे सैन्य असूनही भारत आमचा पराभव करू शकला नाही. पूर्व बंगालमधील पाक सैन्याधिकारी ले. ज. नियाझी यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले - “आम्ही लढाऊ जमात आहोत. या उपखंडात शिस्तबद्ध सैन्य आम्ही उभे केले. भारताच्या अडीच लाख सैन्याशी आमचे ५० हजार सैनिक सहज मुकाबला करतील.") आता या निर्णायक पराभवानंतरदेखील मुस्लिम श्रेष्ठत्वाचे भ्रम कायम ठेवण्यासाठी काही भाकडकथा सांगण्यात येत आहेत. उदा. कराची बंदरावर हल्ला करणाऱ्या भारतीय नौदलाचे नेतृत्व रशियनांकडे होते. राजकीय नेतृत्वाने लष्कराला पश्चिम आघाडीवर भारतीय प्रदेश जिंकू दिले नाहीत. राजकीय नेतृत्वानेच भारताकडून पैसे घेऊन मुद्दाम पराभव घडवून आणला. (म्हणजे कुणी? याह्याखानांनी पैसे खाल्ले असे म्हणायचे तर ते भारताचे हस्तक होते असा अर्थ होतो.) पाकिस्तानात इतकी मूर्ख कारणमीमांसा होऊ शकते आणि सर्वसामान्य मुस्लिम त्याच्यावर विश्वासही ठेवू शकतो, कारण त्याच्या इस्लामी श्रेष्ठत्वाच्या अहंकाराला गोंजारणारी कुठलीही कारणमीमांसा शोधण्यासाठी तो धडपडत असतो. श्रेष्ठत्वाचा हा अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहणार असल्यामुळे असल्या मूर्ख कारणपरंपरा ऐकण्याचा आपल्याला यापुढेही प्रसंग येईल.
 या प्रश्नाच्या गुंतावळ्याची एक निरगाठ बांगलादेशच्या निर्मितीने सुटली असे म्हणता येईल. तथापि शेष पाकिस्तानचे भारतविषयक धोरण लगेच बदलेल असे समजणे चुकीचे ठरेल. उरलेल्या पाकिस्तानचेदेखील राजकीय विघटन होईल असे समजणेही घातक ठरेल, ठरले आहे. आहे त्या पाकिस्तानात समानतेच्या आधारावर एकसंध राष्ट्र निर्माण करणे शक्य नाही. अफगाणिस्तानकडून, पख्तुनिस्तानकडून फारसे दडपणही आता येणे शक्य नाही. अफगाणिस्तानची भूमिका गेल्या काही वर्षांत बदलली असल्याचे दिसून येते. पख्तुनिस्तानला शाब्दिक पाठिंबा देत राहण्याने पाकिस्तानवर दडपण येऊन त्यातून आपल्याला व्यापाराकरिता बंदराच्या सोयी मिळाल्यावर अफगाणिस्तान पाकिस्तानबरोबर समझौता करील. इराणचे आणि पाकिस्तानचे संबंध तूर्त तरी मैत्रीचे आहेत. बलुची विभागातील फुटीर चळवळींना पायबंद घालण्यासाठी इराणच्या सीमेपलीकडील उभे असलेले सैन्य पाकिस्तानला उपयोगी पडेल. तूर्त इराण व तुर्कस्तान यांच्याबरोबर आर्थिक व व्यापारी कराराने पाकिस्तान बांधला गेला आहे. या तीन प्रदेशांची सलगता पहाता त्यांचे बंध अधिक निकट बनण्याची येत्या नजीकच्या काळात शक्यता वाटते. या गटात अफगाणिस्तानलाही सामील करून घेण्याचे प्रयत्न केले जातील आणि हळूहळू अफगाणिस्तान या राष्ट्रगटात सामील होण्याचीही शक्यता वाटते.

 भारत-पाक संबंधाना नवे वळण लागण्याच्या दृष्टीने दोन पर्याय या ठिकाणी उभे राहतात. भारत आणि पाकिस्तान यांनी शांततामय सहजीवनाचे तत्त्व मान्य करणे आणि त्याच्याआधारे उपखंडात भारत, पाकिस्तान व बांगला देश असा एक गट निर्माण करणे. सध्या तरी भारत-पाकिस्तान सहजीवनाची कामचलाऊ व्यवस्थादेखील निर्माण करता येणार

पाकिस्तानची उद्दिष्टे /११७