पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रशियाचाही अंतर्भाव होतो. सोव्हिएत रशियाने ताश्कंद करारानंतर पाकिस्तानला शस्त्रे पुरविलीच. निरपराध बंगाल्यांविरुद्ध अमेरिकन आणि चिनी शस्त्रांबरोबर रशियन शस्त्रेही वापरली गेली नाहीत काय?) ही राष्ट्रे भारताला संयम शिकवीत राहिली. सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष श्री. पोदगोर्नी यांनी २५ मार्च १९७१ ला पाकिस्तानी सैन्याने दडपशाहीला सुरुवात केल्यानंतर चिंता व्यक्त करणारे एक पत्रक काढले. ते वगळता पुढे भारत-पाक मैत्रीकरार होईपर्यंत रशियन नेते भारताला संयम शिकवीत होते आणि पाकिस्तानला अखंडत्वाचे आश्वासन देत राहिले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खूष करण्याचे दुटप्पी राजकारण फार काळ चालू देण्यात येणार नाही अशी समज मैत्रीकरारानंतर मॉस्कोला दिलेल्या भेटीत पंतप्रधान इंदिरा गांधींनी रशियन नेत्यांना बहुधा दिल्यामुळे रशियाचे धोरण पुढे बदललेले दिसते. कोणत्याही परिस्थितीत भारताने या एक कोटी निर्वासितांची परत पाठवणी करण्याचा निर्धार केला असल्याचे रशियन नेत्यांच्या तेव्हा लक्षात आले असावे. भारतामध्ये अप्रियता पत्करणे रशियनांना शक्यही नव्हते. अरब जगतात आणि पूर्वेला इंडोनेशियात रशियन परराष्ट्रधोरणाला आलेल्या प्रचंड अपयशानंतर उपखंडात अपयश पदरी देणारा दुटप्पीपणा पुढे चालू ठेवण्यात अर्थ नाही हे रशियनांनी वेळीच ओळखले. कारण चीनचे प्रभावक्षेत्र प्रचंड वाढले असते आणि रशियन हितसंबंधांना उपखंडात अधिक प्रभावीपणे आव्हान दिले गेले असते. अखेर सोव्हिएत रशियाने भारताला राजनैतिक पाठिंबा दिला. भारताची लष्करी कारवाई यशस्वी होण्यामागे रशियाने दिलेल्या राजनैतिक पाठिंब्याचे महत्त्व त्यामुळे कमी लेखता येणार नाही.

 ३ डिसेंबरला पाकिस्तानने पश्चिम आघाडीवर विमानहल्ले केले आणि पुन्हा सर्वंकष युद्ध झाले. नेहमीप्रमाणे यावेळी पाकिस्तानला परिस्थिती कमी अनुकूल राहिली. अंतर्गत दुफळी, पूर्व विभागात अडकून पडलेले सुमारे एक लाख सैन्य, सततच्या नऊ महिन्यांच्या गनिमी युद्धामुळे तेथील पाकिस्तानी सैन्याचे खचलेले नीतिधैर्य आणि याउलट भारतातील उच्च नीतिधैर्य, सैन्यदलांची वाढलेली ताकद आणि परिस्थितीचा फायदा घेण्याची पात्रता असलेले राजकीय नेतृत्व यामुळे अवघ्या बारा दिवसांत या युद्धाचा भारताच्या बाजूने निर्णायक निकाल लागला. प्रथमच पंचवीस वर्षांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांची (आणि जनतेचीही) संपूर्ण मानहानी झाली. असा जिव्हारी झोंबणारा पराभव उपखंडातील मुस्लिम जनतेने आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी कधी अनुभवला नव्हता. याचा अर्थ गेल्या पंचवीस वर्षांत पाकिस्तानची कधी मानहानी झालीच नाही असेही नाही. आपला कधी पराभवच होत नाही, मुस्लिम हा नेहमी अजिंक्यच असतो, ही भाकडकथा (Myth) जिवंत ठेवणे इतके दिवस शक्य झाले. १९६५ च्या युद्धाच्या वेळी आपण भारताचा अधिक प्रदेश जिंकला असे सांगून आयूबखानांनी ही भाकडकथा जिवंत ठेवली होती. वस्तुत: जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर या सर्वच ठिकाणी पाकिस्तानला पराभव आणि अपयश पदरी घ्यावे लागले आहे. तथापि ते जाणवणारे ठरले नाही आणि एक मुसलमान दहा हिंदूंना पुरून उरतो या भ्रमानुसार पाकिस्तानचे छोटे सैन्य भारताच्या अवाढव्य परंतु भेकड सैन्याची धूळधाण उडवील असे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सेनाधिकारी ३ डिसेंबर १९७१ पर्यंत उघडपणे सांगत होते.

११६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान