पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. हा प्रश्न नेहमी 'भारताने पाकिस्तानच्या अस्तित्वाला मान्यता दिलेली आहे का?' अशा स्वरूपात पाकिस्तानकडून विचारला गेला आहे. वस्तुत: तो 'भारतासारख्या मोठ्या शेजाऱ्याचे अस्तित्व पाकिस्तानला मान्य आहे का?' या स्वरूपात विचारला गेला पाहिजे. कारण गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात वेगळ्या पाकिस्तानचे अस्तित्व नष्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न भारताने केल्याचा पुरावा पाकिस्तानने कधी दाखविला नाही. फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या ज्या सीमा बनल्या त्या मागे हटविण्याचे भारताने कधी प्रयत्न केले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताने प्रयत्न केल्याचे एकही उदाहरण दाखविण्यासारखे नाही. उलट भारताच्या सीमा धोक्यात आणण्याचे पाकिस्तानने अनेकदा प्रयत्न केले. भारतातील नागा, मिझो यांच्यासारख्या फुटीर प्रवृत्तींना उघड उत्तेजन दिले. (अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात वादग्रस्त ठरलेली ड्यूरान्ड रेषा ही पाकिस्तानची सरहद्द भारत मानतो अशी घोषणा करून नेहरूंनी पख्तुनिस्तानच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे नाकारले. या उलट मॅकमोहन रेषेसंबंधी भारतचीन वादात पाकिस्तानने घेतलेली भूमिका आता सर्वांच्या परिचयाची आहे.) तरीही भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले आहे असा कांगावा पाकिस्तान करीतच राहिले. या संदर्भात पाकिस्तान्यांची मनोवृत्ती एकदा समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मते भारताने मुस्लिम बहसंख्यांक काश्मीर आपल्या ताब्यात ठेवून पाकिस्तानवर आक्रमण केले आहे. थोडक्यात भारताने आपले राजकीय संघटन करणे म्हणजे पाकिस्तान्यांच्या मते पाकिस्तानचे अस्तित्व नाकारणे आहे. याचा अर्थ असा की भारताचे अस्तित्व आहे, हाच भारत पाकिस्तानचे अस्तित्व नाकारीत असल्याचा पाकिस्तान्यांच्या मते पुरावा आहे. पाकिस्तानची मनोवृत्ती बांगला देशाच्या उदयाने आणि या निर्णायक पराभवाने एकाएकी बदलेल असे समजणे चुकीचे ठरेल आणि म्हणूनच तूर्त तरी उपखंडात पाकिस्तान शांततामय सहजीवन मान्य करण्याची काही शक्यता नाही. दुसरा पर्याय, मग पाकिस्तानने मध्य आशियाकडे वळणे हा होतो आणि इराण आणि तुर्कस्तान यांच्या बरोबरची जवळीक ही पाकिस्तान्यांच्या मनात मध्य आशियाविषयी जी धारणा आहे तिच्या आणि ऐतिहासिक वारशाच्या संबंधात समजून घेतली पाहिजे. हा प्रदेश नेहमी इतिहासात अनेकदा मध्य आशियाई सत्तेच्या वर्चस्वाखाली राहिला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या तेथील जनता आपल्याला तुर्की संस्कृतीचा वारसदार मानते आणि फरगणा प्रांतातून आलेल्या बाबरने पाकिस्तानचा पाया घातला हा सिद्धांत या प्रदेशातील जनतेने उराशी बाळगला आहे. भारताकडे ते वळले तर तूर्त तरी बाबराप्रमाणे विजेते म्हणून जिंकण्याच्या ईष्येने वळतील - सहअस्तित्वासाठी नव्हे.... हे भारतीयांनी ओळखणे आवश्यक आहे. इतिहासाचे हे ओरखडे पाकिस्तानच्या जनतेच्या मनावरून जेव्हा पुसट बनत जातील आणि त्या ओरखड्यांना धर्मवादी प्रेरणांची बेलबुट्टी देण्याचा मोह आणि त्यामागील वैयर्थ्य जेंव्हा लक्षात येईल तेव्हा हे सहजीवन शक्य आहे. इतिहासाचे ओरखडे मुस्लिम समाजाच्या मतावरून लवकर पुसले जात नाहीत ही एक कटू वस्तुस्थिती आहे.

 याचा अर्थ इतकाच की भारताला उपद्रव देण्याची पाकिस्तानची ताकद सध्या कमी झाली आहे एवढेच. घुसखोर पाठवून आसाम गिळंकृत करण्याचा धोका टळला आहे. नागा,

११८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान