पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणे पाकिस्तानच्या उपखंडातील उद्दिष्टांना हानिकारक ठरले असते हे आहे. सर्वच निघून गेल्यानंतर भारताविरुद्ध आणि भारतीय मुसलमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरण्यासाठी एकमेव हत्यार हाती राहिले नसते.
 १९६४ ला झालेल्या दोन्ही देशांतील दंगलीत प्रथमच भारतात पाकिस्तानपेक्षा अधिक मोठ्या दंगली झाल्या. प्रथमच भारतात हिंदूंनी बंगाल, बिहार आणि ओरिसा या ठिकाणी जबरदस्त प्रतिप्रहार केले. बहुधा दंगलींचा हा खेळ आपल्यावर उलटणार असे वाटल्याने या दंगली आटोक्यात आणण्यासाठी थोड्या प्रतिबंधक उपाययोजना आयूबखानांनी केल्या. १९६४ नंतर पाकिस्तानात दंगली झाल्या नाहीत याचा अर्थ प्रचंड दंगली झाल्या नाहीत इतकाच होतो. आता अधिक दंगली होणे म्हणजे भारतात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे आहे हे कदाचित पाकिस्तानी राज्यकर्त्यांना कळून आले असावे. शिवाय पूर्व बंगालमधील हिंदूंची लोकसंख्या आधीच्या दंगलींनी पुरेशी मर्यादित करण्यात आली होती. परंतु पूर्व बंगालमध्ये १९७१ साली स्वातंत्र्याचा उठाव झाला तेव्हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आणि सैन्याने पुन्हा हिंदूंची लांडगेतोड केली. हिटलरने ज्या पद्धतीने ज्यूंना नष्ट करून त्यांचा प्रश्न निकालात काढण्याचा घाट घातला होता, तसाच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी पूर्व बंगालमधून हिंदूंच्या कत्तली करून आणि त्यांना भारतात पाठवून हिंदूंचा प्रश्न निकालात काढण्याचा बेत केला होता. बांगलादेशच्या या स्वातंत्र्यलढ्यात प्रथमच हिंदू अल्पसंख्यांकांवर केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या जगात प्रसृत झाल्या. 'स्पेक्टॅटर' या ब्रिटिश साप्ताहिकाने तर 'फायनल सोल्यूशन ऑफ दि हिंदू प्रॉब्लेम' असेच या कत्तलीचे वर्णन करताना शीर्षक दिले आहे.
 या स्वातंत्र्यलढ्यत भारतात आश्रयाला आलेल्या ९३ लाख निर्वासितांपैकी सुमारे ६३ लाख निर्वासित हिंदू होते. याचा अर्थ बांगला देशमध्ये तेव्हा फक्त सतरा-अठरा लाख हिंदू उरले होते असा होतो. पाकिस्तानामधून भारतात फारसे निर्वासित गेलेलेच नाहीत असे जे पाकिस्तानचे राज्यकर्ते सांगत होते याचे कारण त्यांनी हिंदू निर्वासितांना परत घ्यायचे नव्हते हे आहे. (श्रीमती इंदिरा गांधी यांच्या ऑक्टोबर १९७१ मध्ये दिलेल्या पाश्चात्त्य देशांच्या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे चिटणीस सुलतान अहमद यांनीही काही पाश्चात्य राष्ट्रांचा दौरा केला. पॅरिस येथे एका भारतीय पत्रकारापाशी. 'निर्वासित केवळ वीस लाखच आहेत' असे त्यांनी प्रतिपादन केले. भारतीय पत्रकाराने जनगणना करावयाची सूचना केली व १९६१ च्या जनगणनेनुसार आता बंगालची लोकसंख्या साडेसात कोटी असली पाहिजे असे म्हटले. परंतु सुलतान अहमद यांनी ही लोकसंख्या ६ कोटी ८० लाख आहे असे सांगितले. त्यांनी शिताफीने हिंदू लोकसंख्या या आकड्यातून वगळली होती. भारतीय पत्रकारांनी हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले तेव्हा त्यांनी नुसतेच स्मित केले.)

 हे क्रूर अत्याचार या वेळेला तरी केवळ धर्मवादी सनातनी लोकांनी केलेले नाहीत, धर्माबद्दल फारसे आकर्षण नसलेल्या सैन्यातील सुशिक्षित मुसलमानांनी केलेले आहेत. या सुशिक्षित सैन्याधिकाऱ्यांनी जमाते-इस्लामीसारख्या संघटनांना हाताशी धरले. परंतु अत्याचारांची सर्वस्वी जबाबदारी धर्मांध मुसलमानांवर व मुल्ला मौलवींवर टाकणे बरोबर नाही. पाकिस्तानातील सुशिक्षित मुसलमानांचे मन कमालीचे हिंदूविरोधी कसे आहे आणि हिंदूंना नामशेष करायला

पाकिस्तानची उद्दिष्टे /१०७