पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाकिस्तानातील बहुसंख्यांक मुस्लिम समाजाच्या हिंदूविरोधी भावना अधिक प्रज्वलित करण्यात झाला नाही तरच आश्चर्य. गंमत अशी की सर्वधर्मीय लोक पाकिस्तानचे समान नागरिक आहेत या जीनांच्या घटनासमितीतील उद्गारांच्या ढालीखालीच हा हिंदूविरोधी प्रचार चालू राहिला आणि पाकिस्तान हिंदूविरोधी आहे या आरोपाला “छे छे - कायदेआझमनी पाकिस्तान धर्मनिरपेक्ष होईल असे जाहीर केल्याचे तुम्हाला माहीत नाही?" असे हिंदूविरोधी प्रचार करणारे नेतेच उत्तर देऊ लागले. या दुटप्पी वागण्याचा संबंध इस्लामच्या पारंपारिक जडणघडणीशी आहे. इस्लामची वैचारिक भूमिका न्याय्य आहे असे सिद्ध करून मुस्लिम समाज जणू त्या भूमिकेनुसार योग्य वर्तणूक करतो असे भासविण्याच्या परंपरेतीलच हा प्रकार आहे. स्वत: जीनांनी 'इस्लामने तेराशे वर्षांपूर्वीच लोकशाही अंमलात आणली' असे (मूर्ख) उद्गार काढून पारंपारिक मुस्लिम मनाचे आपण प्रतिनिधी आहोत हे सिद्ध केलेच होते. आता त्यांचे अनुयायी त्यांचीच परंपरा, त्यांच्याच उद्गारांच्या ढालीचा आश्रय घेऊन, पुढे चालवू लागले. काश्मीरमध्ये टोळीवाले घुसल्यानंतर जीना आणि लियाकतअली खान यांनी टोळीवाल्यांना भडकविण्यासाठी जेहादच्या घोषणा केल्याच. मौ. मौदूदी यांनी तेव्हा हे जेहाद नाही' असे म्हटले म्हणून त्यांना अटक करण्यात आली. धर्मनिरपेक्षतेचा जीनांनी उसना आणलेला मुखवटा त्यांनीच जेहादच्या घोषणा देऊन फाडून टाकलेला आहे. हा दुटप्पीपणाचा आदर्श पाकिस्तानचा प्रत्येक राज्यकर्ता पुढे पाळीत राहिला.

 १९४७ नंतर पूर्व बंगालमध्ये तीन मोठाल्या दंगली झाल्या. किरकोळ दंगली किती झाल्या याची मोजदाद करणे शक्य नाही. १९५० च्या दंगलीचा उल्लेख येथे येऊन चुकलाच आहे. १९५६ साली पुन्हा मोठाल्या दंगली झाल्या आणि १९६४ साली त्याहूनही मोठ्या झाल्या. १९५६ आणि १९६४ साली या दंगलीत अनुक्रमे तीन लाख आणि दहा लाख हिंदू निर्वासित बनून भारतात आले. दरवेळी हिंदूंना परत घेण्याची, त्यांची मालमत्ता परत देण्याची, त्यांच्याविरुद्ध पक्षपात न करण्याची हमी पाकिस्तान देत राहिले. परंतु तसे निश्चित पाऊल उचलण्याचे ते सारखे टाळीत राहिले आणि म्हणून पाकिस्तानमधील हिंदूंची लोकसंख्या फाळणीच्या वेळी अंदाजे एक कोटी साठ लाख होती ती १९७० मध्ये नव्वद लाखावर येऊन ठेपली. या काळातील लोकसंख्येची वाढ लक्षात घेता हिंदूंची लोकसंख्या सव्वादोन कोटी असायला हवी होती. फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानात झालेल्या भयानक दंगली पाकिस्तान सरकारला आवरता आल्या नाहीत, त्या दंगलींमागे सरकारचा हात नव्हता असे वादाकरिता मानले, तर तेथून आलेले चाळीस लाख निर्वासित वजा जाता एक कोटी वीस लाख हिंदू पाकिस्तानात उरत होते आणि त्यांची संख्या लोकसंख्यावाढीनुसार आता एक कोटी साठ लाख एवढी व्हायला हवी होती. आता पाकिस्तानात केवळ नव्वद लाख हिंदू उरले. १९४७ ते १९६५ या काळात जे प्रचंड स्थलांतर झाले त्याचा सर्व दोष पाकिस्तानी राज्ययंत्रणा आणि पाकिस्तानचे सरकारी आणि बिनसरकारी सुशिक्षित नेतृत्व यांच्याकडे जातो. या सरकारी नेतृत्वाने प्रथम हिंदूंची नोकऱ्यांतून हकालपट्टी केली, सतत दंगलींना उत्तेजन दिले, भारताबरोबरच्या वादाला सतत धार्मिक अधिष्ठान दिले. अशा वातावरणात हिंदू अल्पसंख्यांकांना पाकिस्तानात राहणे कठीण होऊन गेले. एखादा अपवाद वगळता

भारत - पाक संबंध/१०१