पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांचे विचार प्रगतीशील आणि पुरोगामी आहेत याची साक्ष ग्रामगीतेत सर्वत्र पटते. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्जबाजारी होऊ नये. वंचित माणूस हा आज अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन या सर्व गोष्टींपासून दूर आहे, मग हे कर्मकांडाचे थोतांड कशाला? 'मृत शरीरास पीतांबर। घरी नसल्यास विका घर। दुःख भोगा जन्मभर। ऐसे कोणी न करावे।। असेल तैसेचि वागावे। जुनेही वस्त्र स्वच्छ करावे। खुशाल अंगी बांधोनी न्यावे। मृताचिया गरिबांनी।। नवेचिवस्त्र पाहिजे आणिले। ऐसे शास्त्राने जरी सांगितले।। तरी आमुच्या घरचे कैसे चाले। नाही ठाऊके शास्राशी।।' ही ग्रामगीता नावाप्रमाणे जरी खेड्यासाठी असली तरी शहरी जीवनालाही ती मार्ग दाखविते. या ग्रामगीतेची शिकवण म्हणजे मनुष्य जीवन एकाकी, एकेकट्याचे नसते. तसे ते राहूही शकत नाही. त्याला परस्पर पूरक होऊन समाजात वावरावे लागते. त्यासाठी समरसता समता-एकता भावाची गरज समाजाला असते. बहुजन समाजासाठीच तुकडोजींची ही रचना आहे. एका अत्यल्पशिक्षित महापुरुषाने ग्रामोन्नतीसाठी लिहिलेल्या या हजारो ओव्या म्हणजे मराठी साहित्यातील एक आश्चर्य आहे. विशेष म्हणजे त्यात प्रतिगामीपणा, बुरसटलेपणा विचारांचा नाही. 'आम्ही आपल्यासाठी मरतो। देव सकळांसाठी कार्य करतो। हाचिभाव त्याने स्फुरतो। म्हणोनि धरिला देव चित्ती।।' त्यांची अस्तिक्याची पुरोगामी कल्पना अप्रतिम आहे. (३३)