पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोणताही आडपडदा न ठेवता प्रतिपादिले आहे. अलक्षित झोपी गेलेल्या ग्रामीण समाजाला जागवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अडाणीपणा, लोकसमजुती, रुढी आणि सामाजिक जडत्व यामुळे गावागावाच्या जीवनात जी अवकळा आली आहे ती नष्ट करावी. खेडूतांच्या मनात अनेकविध सुधारणा घडून याव्यात, त्यांची जीवने सुखी व्हावीत. त्यांच्या ग्लानी आलेल्या, मरगळलेल्या जीवनात नवचैतन्य फुलावे यास्तव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अंत:करण सदैव तळमळत होते. ग्रामगीतेतून, त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रगट होणारा जिव्हाळा ग्रामीण जनतेची हृदये हलवून त्यांच्या जीवनाला नवा उजळा देणारा आहे. आज ग्रामीण भागात सर्वत्र बुद्धिभेद केला जातो. तेव्हा व्यक्तीची, आपण वावरतो त्या समाजाबद्दलची जबाबदारी नेमकी काय आहे हे या ग्रामगीतेत सांगितले आहे. केवळ वितंडवाद न माजवता आपण प्रत्यक्ष आचरण करून समाजोन्नती घडवून आणली पाहिजे. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' आणि त्याही पुढे जाऊन लोकानुकंपाय सर्वत्र संचार समाजात असला पाहिजे. नुसता तात्विक कीस न पाडता, ब्रह्मवादी न बनता आपण व्रती बनून, निष्ठावंत सेवक बनून ग्रामोद्धार करावा. ग्रामगीतेत रसाळ भाषाशैलीत मार्मिक वर्णने आणि अतिशय सुंदर विवेचन जागोजाग आले आहे. उदा. जैसी नदी सागराशी मिळे। सोडोनि भेदभाव कष्ट बळे। तिचे कार्यचि होते सगळे। मिळण्यासाठी सागरी।। (३२)