पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संगोपन ही माऊलीच करीत असते. ती घर सांभाळते. म्हणूनच वेदाने 'मातृदेवोभव।' असा तिचा गौरव केला आहे. भक्त प्रल्हादाची आई - कयाधु, रामाची माता कौसल्या, कृष्णाची देवकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जिजामाता गौरवार्ह आहेत. पुरुष जेव्हा चिंतातूर तेव्हाच घरची लक्ष्मी विचार करून सांगते. त्याला तारते. यास्तव स्त्रियांना सुशिक्षित आणि पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांचा व्यक्तित्व विकास घडवून आणावा असे संत तुकडोजींचे म्हणणे आहे. स्त्रीयांचे जीवन, पुरुषांनी रुक्ष करू नये. तिलाही पुरुषांप्रमाणेच पूर्ण मोकळिक असावी. 'चूल आणि मूल' हा काळ संपवून टाकावा. विधवा स्त्रियांचे पुनर्वसन करावे. असे अत्यंत पुरोगामी विचार त्यांनी मांडलेले आहेत. सर्व समाजाने मुलींना उत्तम शिकविणे हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. अत्यंत चकित करणारी ही त्यांची आधुनिक विचारसरणी आहे. ते म्हणतात - 'म्हणोनि रथाची दोन्ही चाके। मजबूत करावी कातोनि सारखे।। ___ तरीच संसारगाडी सुखे। सुखावेल ग्रामजीवनाची।।' असा हा आजच्या काळासही अत्यंत उपयुक्त विचार संत तुकडोजींनी मांडला आहे. तुकडोजी महाराज प्राचीन संस्कृतीचे जसे अभिमानी होते तसेच अद्ययावत शास्त्रीय दृष्टिकोणाचेही पुरस्कर्ते होते. महिलोन्नती जागृती कार्य त्यांच्या ग्रामगीतेने केले. सर्वसामान्य जनतेला उपयुक्त असा हा ग्रंथ आहे. तो लिहून लोकसेवेचे महनीय कार्य त्यांनी केले. म्हणूनच तुकडोजींची 'ग्रामगीता' सर्वसाधारण जनतेची भगवद्गीता झाली आहे. (२७)