Jump to content

पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खंजिरी भजन माला : संत तुकडोजी महाराजांची भजने जन सामान्यांच्या अंत:करणाचा ठाव घेणारे असायचे. त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानात केवळ ईश्वरभक्तीच नव्हती तर समाजातील दुःख, वेदना विषमता खंत प्रतीत होत होती. संत तुकडोजी महाराजांची खंजिरी, ही भजन पद्धती म्हणजे एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार हे समाजातील माणसामाणसांच्या अंत:करणाला जाऊन भिडत असत. संत तुकडोजींची ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांच्या त्या खड्या आवाजातील असंख्य भजनांनी जनमनाचा ठाव घेतला होता. आपले विचार सर्व सामान्यजनांपर्यंत रुजविण्यात त्यांची खंजिरी भजने नि:संशय यशस्वी ठरली. अंधश्रद्धानिर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी त्यांच्या या खंजिरीवरील भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावी वापर केला. भजनांजली हेच खऱ्या अर्थाने त्याच्या समाजप्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. आवाजांच्या स्वरांच्या स्वरूपात तयार झालेली उर्जा कधीच नष्ट होत नाही. ती उर्जा आसमंतात आवाजाच्या आणि सुरांच्या निनादात कायम वावरत असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजिरीचा निनाद, तोच सूर, तीच अभिव्यक्ती त्यांच्या शिष्यगणांकडून आजही अनुभवता येते. संत तुकडोजींचे हे समाजप्रबोधन ऐकण्यासाठी हजारो माणसांची विदर्भात रीघ लागत असे. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे' (२१)