पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वृत्तीचे विचार प्रगट केले आहेत. ते म्हणतात की या माझ्या गरिबाच्या झोपडीत मला माझे सारे काही सुख-समाधान आनंद मिळाला आहे. महाराजे लोकांना त्यांच्या महालात जे सुख मिळत नाही, ती सुखं, ते सारे काही या झोपडीत मी भरून पावलो आहे. या दोऱ्या नसलेल्या झोपडीत चोरीची भीती नाही. जिथे तिजोरी, संपत्ती सोनेनाण्याचे गाठोडे असते तिथेच चोरीची भीती असते. या मऊ बिछान्यापेक्षा माझी उघडी जमीनच मला जास्त मानवते. परमेश्वरही शेवटी भक्तीचा, भावाचाच भुकेला असतो, तेच मला झोपडीत राहून नीट साधते. 'भुकेला कोंडा, निजेला धोंडा' अशी ही स्थितीही मन:शांती असेल तर मन आनंददायी असते. अशीच एक म्हण आदिवासी बांधवांमध्ये रुढ आहे. ‘फडका घे, मडका घे सूट' याचा अर्थ माणसाला सुखासमाधानाने जगण्यासाठी फार काही लागतच नाही. लज्जा राखायला एक फडका आणि अन्न पाण्यासाठी एक मडकेही पुरे होते. हेच सात्विक समाधान संत तुकडोजी या अभंगात व्यक्त करतात. __ (१३)