करण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे राजवाडयासुद्धां एकंदर ३०० घरें आवाजी सोनदेव यानीं वांधिली.या कामास तीन वर्षे लागलीं. आणि ही सर्व घरें राहण्यास सोईची आणि शत्रूच्या येण्याच्या ज्या ज्या वाटा होत्या त्यांचा योग्य रितीने बंदोबस्त राही व देखरेख होई अशा प्रकारें बांधिलीं होतीं. किल्ल्यांतून बाहेर पडण्याच्या कांहीं चोरवाटा अशा केल्या होत्या कीं, त्या एसाजीकंक किंवा तानाजी मालुसऱ्या सारख्या परमविश्वासु मावळ्यांस मात्र माहीत; इतरांस त्यांचा थांग मुळींच लागावयाचा नाहीं. अशा प्रकारें किल्ल्याचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एके दिवशीं आबाजी सोनदेव यानीं केलेला बंदोबस्त काय कसा झाला आहे, हे पहाण्याकरितां सभा भरविली. आणि सभेचे मध्यभागी सोन्याच्या नाण्यांनीं भरलेली लहानशी थैली; आणि गळ्यांत घालण्याचा सरीसारखा एक दागीना अशी दोन इनामें ठेऊन सर्वांस सांगितलें कीं, जो कोणी प्रसिद्ध रस्त्याशिवाय किल्ल्यावर चढून येईल त्यास हें ठेविलेलें इनाम देईन. तेव्हां दूर उभा राहिलेला एक महार पुढे आला, आणि जोहार करून ह्मणाला की, "धन्याची आज्ञा असेल तर मी यत्न करून पहातों आज्ञा असावी." महाराजांनी तत्काळ अज्ञा दिली. सर्वांसमक्ष तो खाली जाऊन अनेक यत्नांनीं एके कड्यावरून युक्तीनें शेवटीं वर चढून आला. तेव्हां महाराज आश्चर्य पावून त्यास शाबासकी दिली. आणि
पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/१०
Appearance