Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
[§११२
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.

येकची मागणे आतां । द्यावें तें मजकारण ।
तुझा तूं वाढवी राजा । सीघ्र आम्हांची देखतां ।
दुष्ट संव्हारिले मागें । ऐसें उदंड ऐकतों ।
परंतु रोकडें कांहीं । मूळ सामर्थ्य दाखवी ॥
देवाची राहिली सत्त्वे । तूं सत्त्व पाहासी किती ।
भक्तांसी वाढवीं वेगीं । ईच्छा पूर्ण परोपरी ॥
रामदास म्हणे माझें । सर्व आतुर बोलणें ।
क्षमावें तुळजे माते । ईच्छा पूर्णची ते करी ॥

-रामदासांची कविता ३९३. १-२०.
११३. शिवाजीचे वर्णन.
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंडस्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥१॥
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैंची ॥२॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि छत्रपति । शक्ति पृष्ठभागीं ॥३॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥४॥
आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठाई ॥५॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले॥६॥