पान:रामदासवचनामृत.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. १. श्रीसमर्थ रामदास यांच्या चरित्रासंबंधाने खात्रीलायक पुरावा पाहिजे असल्यास तो “वाकेनिशीप्रकरण" या नांवाच्या प्रकरणांत सांपडेल. रामदासांचा काल माघ वद्य ९ शके १६०३ या रोजी झाला. यानंतर चारच दिवसांनी म्हणजे माघ वद्य त्रयोदशीस रामदासांचे पट्टशिष्य दिवाकर गोसावी यांनी सांगितल्यावरून रा. अंताजी गोपाळ वाकनीस यांनी रामदासांच्या चरित्राचे टिपण करून ठेविलें आहे. इतिहाससंशोधक रा. राजवाडे हे काही वर्षांपूर्वी चाफळास गेले असता त्यांस हे " वाकेनिशीप्रकरण" तेथील एका दप्तरांत उपलब्ध झाले. रामदासांचा मुख्य मठ चाफळास असल्याने तेथे उपलब्ध झालेल्या या वाकेनिशी प्रकरणाचे महत्त्व किती आहे हे सांगणे नकोच. हनुमंत स्वामींनी जी रामदासांची बखर लिहिली ती प्रथम शके १७१५ त लिहून नंतर शके १७३९ मध्ये त्यांनी वाढवून ती पुनः लिहिली. रामदासस्वामींच्या निधनानंतर सरासरी शंभर वर्षांनी लिहिलेल्या या बखरीपेक्षा रा. अंताजी गोपाळ वाकनीस यांनी जें रामदासस्वामींच्या निधनानंतर चारच दिवसांनी “ वाकेनिशीप्रकरण " लिहिले आहे त्याची किंमत फारच आहे हे सांगणे नको. या प्रकरणांत ज्या काही अद्भुत चमत्कारांच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सोडून दिल्या, तरी त्याच्या मुळाशी बरेच ऐतिहासिक सत्य आहे हे वरवर पहाणाऱ्यांससुद्धा दिसून येईल; व हे सत्य काय आहे याचा आपण आतां विचार करूं. २. शके १५३० चैत्र शुद्ध १ रामनवमीचे दिवशी रामदासांचा जन्म झाला. शके १५३७ रामदासांच्या वडिलांचे निधन. शके १५४२ रामदास जांबगांवाहून टांकळीस पळून गेले. याबद्दल दोन गोष्टी उपलब्ध आहेत. एक, रामदासांच्या आईनें अत्याग्रह केल्यावरून आपल्या भाचीशी लग्न करण्याचे कबूल करून रामदास ‘सुमुहूर्ते सावधान' म्हटल्याबरोबर मंडपांतून पळून गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की, रामदासांचे ज्येष्ठ बंधु गंगाधरपंत यांजजवळ रामदासांनी मंत्र मागितला असता त्यांनी तो देण्याचे नाकारले, म्हणून ईश्वराच्या शोधार्थ रामदास नाशिकजवळ टांकळी येथे गेले.