पान:रानवारा.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिला 'भोरडी ' च म्हणतात.' कमलचं घर जवळं आलं, तेव्हा आम्ही बोलणं थांबवलं होतं. आम्ही दगडी पायऱ्या चढून गेलो. पहिल्या खोलीच्या दारात जाताच नको वाटणारा, एक विशिष्ट दर्प नाकात शिरला. आत डोकावून पाहिलं. केळीच्या पानावर कमलचा वस्त्रहीन देह पहुडला होता. खोलीत दुसरं कोणी नव्हतं. हलक्या पावलांनी आम्ही आत गेलो पण-- ' आईऽऽ ! आईssग, माझ्या अंगावर काहीतरी घाल कीऽऽ! आमची चाहूल लागताच ती मोठ्याने ओरडली. त्याबरोबर तिची आई धावतच बाहेर आली. तिच्या अंगावर एक पातळ कपडा टाकून, तिला झाकल्यावर तिच्या आईचं लक्ष आमच्याकडं गेलं. ( 'तुम्ही व्हय ? या.. आसं अड्याल या. हिथं घोंगड्यावर बसा, मी आतलं आवरून आल्येच. बसा तवर.' कमलची आई स्वैपाक घरात गेली. आम्हाला अगदी अपराधल्या- सारखं झालं. आम्ही एक भाजलेलं शरीर पहायला आलो होतो. पूर्णावस्थेतील त्या विवस्त्र शरीराला वेदनेपेक्षा लाजेचं भान ठेवणारं मन होतं, हेच आम्ही विसरलो होतो. आपलं उघडं शरीर झाकण्यासाठी जीवाच्या आकांतानं कमलनं जेव्हा तिच्या आईला हाक मारली, तेव्हा मात्र आम्हाला आतून अगदी गलबलल्यासारखं झालं होतं. कमलनं आमच्याकडं एकदा पाहिलं. त्या नजरेत आम्ही काही शोधण्यापूर्वीच ती नजर आढ्याकडं वळली. ती आमच्याशी काही बोलू इच्छीत नव्हती; नव्हे, तिच्या सर्वस्वाबरोबरच आमच्या सारख्यांच्या सामान्य ओळखीही जणू करपून गेल्या होत्या. आमच्या ओळखीचे कोळसे तिने नजर फिरवूनच जणू आमच्यापुढे केले होते. आम्ही तिथं आणखी काय पाहणार होतो ? जाधवबाईकडं मी पाहिलं नजरेनंच एकमेकीस आम्ही म्हणालो, 'उगीच आलो ' पण कमलच्या आईनं बसायला सांगितलं होतं. म्हणून बसायला हवं होतंच. आम्हा दोघींच्या नजरा सहजपणे कमलवर खिळल्या होत्या. ती जाणीवपूर्वक आपलं शरीर अधिकाधिक झाकण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यामुळे तिच्या वेदना वाढत असाव्यात असं तिच्या चेहऱ्यावरून उसास्यांवरून जाणवत होतं. ओली जखम । ८६