पान:रानवारा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेद घरभर पुरणाचा खमंग वास सुटला होता. शांती पुरण वाटत होती. धुरानं डोळं भरत होतं. केसाच्या बटा कपाळावर रूळत होत्या. त्यातून घाम ओघळत होता. ती पुरणानं भरलेला हात तसाच वर नेऊन बाहीनं घाम पुसायचं नि केस मागं सारायचं काम ती एकाचवेळी करत होती. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. पुरण वाटायची घाई करत होती. वाटताना तिची आतडी गोळा होऊन येत होती. कांत्या आत बाहेर करीत होता. मधूनच तो शांतीजवळ येऊन, ' झालं का ?' विचारत होता. काही वेळानं त्यानं तसं विचारणं सोडून दिलं. नुसताच येऊन उभा रहायचा. तेही त्याला फार वेळ जमलं नसावं, कारण त्यानं शांतीपुढं पुरणासाठी हात पसरला. तिनं पुरणाच्या हातानं त्याच्या हातावर चापट मारली. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नाक ओढीत त्यानं तिच्या पाठीत बुक्की घातली नि अंगणात पळाला. शांती पुरण वाटत वाटत मुसमुसत होती. " शांते, निवेद तयार झालाय. बांधून देत्ये शेताला बिगबिगी ६ जाऊन ये.