पान:रानवारा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डोळं पुसीत व्हायलो. वैनी आत हुती. पोराला आडवं घिऊन नवन्याची मर्दुम्की बघत हुती. माझ्या खुज्या बांध्याची हालचाल तिला हासू आणीत हुती. मला माझ्या दुबळ्यापणाचा राग आला. थिटं हात-पाय कापून टाकावंत आसं वाटलं. ह्ये जमणार नव्हतं. तात्यानंच मला लई लई मारावं आसं वाटलं, मजी सारं संपल. पुन्हा आसं सोसावं लागणार नाय. सर्गात गेल्यावर देवाला म्हणीन, 'मला पाखराचा जल्म दे. माणूस माणसाला कधी माणसासारखं जगू देत नाय. जग लई वंगाळ हाय. माझं थिटं हात कष्ट करायला खंबीर आसलं तरीबी मला वाचवू शकलं न्हायती. चंदाला तिच्या बाळाला मी आधार दिऊ शकलो नाय.' आणिक देवाला इचारीन, आशा वंगाळ जगात चंदाच्या बाळाला तू का पाठीवलंस ? तुला दुनियेची रीत ठावं आसूनबी तू वंगाळ केलंस. मला थिटं हात-पाय दिलंस म्हणून मीबी दुबळा झालो. आसं करून तुला काय मिळालं ?" कितीबी आंग चोरलं तरी तात्याच्या लाथा बसत्याती. भुईत शिरता येत नाय. जीवसुदीक जात नाय ooo