पान:रानवारा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मलाबी पाठीवर हात फिरल्यावाणी वाटायचं. बरं वाटायचं. आय गेल्यापास्न आसी माया कुणी लावली नाय. आता तात्या तसं वागत हुता. माझा जीव सुखावला हुता. आठवड्यात चार-सा दिवस दुसन्याच्या शेतावर रोजगार करायला जात हुतो; पण त्येबी तात्यानं बंद केलं. कायमचं नसलं तरी तात्पुरतं बंद केलं हुतं; पण माझा जीव सुपाएवढा झाला हुता. तात्याच्या दगडावाणी काळजातवी पाण्याचा झरा हुता. सारं नवंच बघायला मिळत हुतं. लगीन ठरल्याची गोष्ट मतूर गावात कुणाला बोलायची नाय, आसं तात्यानं मला बजावलं हुतं. तात्याच्या घसटीतली चार-सा माणसं, आया बाया, एवढीच तांदळादिशी कराडला जायाचं, तिथे कार्यालयात लगीन हुणार हुतं. पण कायबी म्हणा आसं मुकाट्यानं, चोरट्यावाणी माझं लगीन लागावं ह्ये मला बरं वाटत न्हवतं. मला वाटायचं. माझं आई-बा आसतं तर आसं केलं आसतं का त्येनी ? पण कुणास ठावं माझ्यासारख्या खुज्याचं लगीन कुणी केलं तरी आसतं का ? दुसरी एक पाल मनात कुचकुचायची, पोरीनं पाह्यलं नव्हतं. ऐन तांदळाच्या येळला ह्यो 'बटुचा अवतार' बघितला नि फेकलं बाशिंग तर.... ! काय घ्या ? तात्यानं काय ठरवून ठिवलंय कुणास ठावं. त्याच्यापुढं काइच बोलायला जीभ वळत नाय. तोंडात खाडकन् चापट मारील. त्यापरीस काय हुयाचं त्ये हुईल. आपण काईच बोलायचं नाय. इचारायच नाय. मंगल आष्टका झाल्या. तांदूळ पडलं अंगावर वाजंत्री वाजवू लागलं. आंतरपाट बाजूला करून बामण नवरीला म्हणला, हार घाला आता वराला.' एकदा सोडून दोनदा आसा बोलला तवा तिनं हार घातला मला. मला वाकायला लागलंच नाय. होम-बीम सारं ना चुकता बामण पटापटा भाताच्या लावणीवाणी उरकीत हुता. नवरी मुलगी बामणानं सांगितल्या परमाणं करीत हुती. मीबी करीत हुतो, पण नवरी खुषीत नव्हती. मग मला तरी त्ये कसं बरं वाटावं ? पण वाटलं, लगीन झाल्यावर आई-बा सोडून जायाचं म्हणल्यावर पोरीच्या जातीला वंगाळ वाटणारच. नवरीला घेऊन आमी गावाकडं आलो. तात्यानं गपचीप पुढची जय्यत तयारी केली हुती. गावाच्या येशीत वाजंत्री आलं. तिथनंच वाजत- दुबळा । ५६