पान:रानवारा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाटाच्या पाण्याबरोबर दुडदुडत रांगायचं. विहिरीच्या बगाडावर उभं राहून सारं शिवार न्याहाळायचं. सान्या शिवाराला साद घालायचं. उभ्या पिकाला अलिंगन द्यायचं. सासुरवाशीण रुणझुण पाखराच्या सोबतीनं माहेराला जाते जाते त्याप्रमाणं बसल्या बाकावर शिवराम शिवाराच्या स्वप्नात रंगून जाई, जेव्हा शिक्षक त्याला काही विचारतील किंवा शेजारचा विद्यार्थी त्याला धक्का देईल तेव्हा त्याची तंद्री भंग पावायची. शिवारात चौफेर मुक्त भटकून प्रफुल्ल झालेलं मन ठेच लागल्याप्रमाणं अडखळून स्थीर व्हायचं. रानपाखरासारखं वान्याबरोबर भराया मारणारं मुक्त मन इतरांच्यामुळं तेव्हा थान्यावर यायचं, परीक्षा जवळ आल्यावर तो धास्तावल्या मनानं अभ्यास करू लागायचा. जेमतेम पाम व्हायचा. बाप्पा कान उघाडणी करायचं. 'तुझं ध्यान अभ्यासाकडं नसतं. इथून पुढं आज्याबात शिवारात फिरकायचं नाय. ऊसात, इंजनाजवळ अन् इहिरीकडं तुझं काय गठळ अपतं ? तूझा तू अभ्यास बघ. जमिन जुमला जागा सोडून जाणार न्हाईत. पण हे वय पुन्हा येणार नाय. शिकून घे नाय तर एक येळ आशी येईल की पस्तावा करत बसशील पण उपेग व्हणार नाय.' आणि तसंच झालं. दहावीचा अभ्यास करताना वांड मनाची कुतरओढ झाली. मळयात काय चालल असंल, खळयात काय पडलं असंल, डोंगराकडच्या शेताकडं मोर नाचत असतील, इंजिनाचा पट्टा ढिला झालाय, बाप्पांनी आवळला असंल का शेरीतली ज्वारी जोसात आलीय, पण पाखरं काय करत्यात कुणास ठाऊक, असल्या असंख्य विचाराने तो अस्वस्थ होई. विचाराच्या मुंग्या डोक्याचं वारूळ करीत. हातातलं पुस्तक हातातच राही. भिरभिरणारं मन वास्तवात आल्यावर पंखात चोच खूपसून बसाणाऱ्या पाखरासारखं उदास होई. काय करायचं शिकून ? नोकरी करायची तर गाव सोडून जावं लागंल. कुठल्यातरी ऑफिसात फायलीत तोंड खुपसून बसावं लागलं. आता जाता येतय तेवढंही शिवारात जायला मिळायचं नाही. हिरवं हिरवं रान, पाखरांची गाणी, झुळझळणारा ओढा, तुडुंब विहिर, बहरलेली पेरू-आंब्याची झाडं, रसाळ-मांसल ऊस, घेऊन सारं शिवार डोलायला लावणारा वारा आणि या समग्र वातावरणाला व्यापून राहिलेला विशिष्ट गंध, यातलं काहीच मिळणार नाही. अशा गिरक्या रानवान । १६