पान:रानवारा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नुस्तं वाटतं. कंठ दाटून आला. भुई चाचपीत मी तसाच खाली बसलो. आई पडवीत येऊन मऊ आवाजात म्हणाली 'नामा, राजा तू कुठंवर तिथं बसणार ? ती कुत्र्याची जात. आसंच मराण आसतं त्या जातीला. वंगाळ वाटून घेऊ नगस.' कुत्र्याची जात म्हणून आसं मरण, मग माणसाच्या जातीला कसं ? मला कसं ? मन सैरभैर झालं होतं. मला सुचेना, समजेना. मरण म्हणजे काय ? जीव जातो म्हणजे काय ? तो कुठं जातो ? खंड्याला पुरायला न्यायला तराळ आला. रडून रडून मी थकलो होतो. माझी आसवं आटून गेली होती. मन टाहो फोडत होतं. तराळानं खंड्याचं पाय सुतळीनं बांधलं. मला माझंच पाय कुणी सुतळीनं बांधतंय असं वाटलं. खंड्याला तराळ आता ओढीत नेणार ही कल्पना मला सहनच झाली नाही. मी उसळून म्हणालो, 'तसं ओढतं त्याला न्यायचं नाय.' आबांनी ऐकलं. नवं गोणपाट तराळाला दिलं. म्हणालं, ' यात घालून खांद्यावरून ने. दोन रुपयं जादा ने. पोराचं मन दुखवायचं नाय.' खंड्याला तराळ घेऊन निघाला. त्याच्यामागं मी चाललो. जाताना आबा काही बोलले नाहीत, म्हणून आई गप्प होती. सदा बडबडणारी आजी वाकड्या मेढीसारखी उभी होती. खंड्याच्या प्रेतामागं माझं मन धाय मोकलीत चाललं होतं. नागपंचमीचा सण होता. आजोबांच्या थडग्यास निवेद घेऊन आईनं मला रानात धाडलं होतं. आजोबाना मी पाह्यलं नव्हतं. थडगंच पहात आलो. आंब्याच्या झाडाखाली छानसं थडगं. कळू लागल्यापासून मी थडग्याला निवेद घेऊन जायचा. अशा टायमाला खंडया संगती असायचा. पण आज नाय. थडग्याच्या पायशाला दाट, गार, सावलीत खंड्या कधी कधी पाय पसरून, डोळे उघडे ठेवून पडून व्हायचा. मी कुठं निघालेला दिसलो की चटकन उठायचा. खंड्याला मी माया लावून मोठा केला. त्यानं त्या बदल्यात मला खूप खूप दिलं. उदंड माया केली. शेवटी माझ्या शब्दाखातरं कुर्बान झाला जणू. मी त्याच्यासाठी आज काय करतो ? न पाह्यलेल्या माझ्या आजोबांच्या थडग्याला रानात निवेद आणतो नि खंडचाला ? आई म्हणते आजोबांना पुरणपोळी आवडत नव्हती; पण खंड्या । ९