पान:रानवारा.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अश्रूंचे वाट - दाट पडदे पडले. खोलीच्या बाहेर येऊन कमलच्या आईचा निरोप घेतला. नाकावर येणारं आसवांचं ओघळ ती बोटानं पुसत होती. आम्ही दोघीही तिचा हात हातात घेऊन सहानुभूतीने किंचित दाबला. जीभेवर पांगळं शब्द अंग घरीत नव्हतं. मुक्यानंच घराकडं वळलो. कोपन्यावर आल्यावर जाधवबाई त्यांच्या घराकडं वळल्या. आम्ही जे नुकतंच पाहिलं होतं, अनुभवलं होतं, त्यामुळं बेचैन मनःस्थितीतच होतो. काही एक न बोलता नुसत्या नजरेनंच बाई ' जाते' म्हणाल्या. त्या गेल्या. त्यांच्या पाठमो-या आकृतीकडं मी सुन्न-वधिर नजरेनं पहात मिनिटभर उभीच होते. मनात विचार आला, आपण सारे जीवनयात्रेतील प्रवासी. दोन दिसांची रंगत संगत । दोन दिसांची नाती अशी पाखरे येती ॥ ... त्यातील एखादा पुढं निघाला तर दुसऱ्यानं फक्त पहात रहायचं. निरोप द्या अगर न द्या, जाणारा तो जाणारच. आपल्या हातात काहीच नसतं. वाटतं मात्र खूप खूप असल्यासारखं आकाशालाही गवसणी घालण्याइतकं ! कमलच्या आईलाही असंच वाटतं. येईल का तिच्या श्रद्धेला यश ? कष्टाचं आभाळ पेलण्याची हिंमत आणि देवधर्मावरील श्रद्धा तिच्या कमलला बरी करू शकेल ? तिच्या शब्दाशब्दातून ओसंडणारं कातर वात्सल्य विसर पडण्यासारखं नव्हतंच. आमच्या चाहूलीमुळं जीवाच्या आकांतानं कमलनं आईला घातलेली करूण- भयानक साद मनाच्या कडेकपारीत घुमत होती. त्या दिवसानंतर रोज मी कमलच्या प्रकृतीची न चुकता चौकशी करू लागले. तो माझ्या रिकाम्या मनाचा चाळा नव्हता. ती एक जिव्हारी धास्ती होती एका मातेच्या वात्सल्यभरल्या सुश्रुषेच्या यशापयशाची. दिवसेदिवस कमलच्या ओरडण्याचं प्रमाण वाढतच चाललं होतं. आमच्या घरात ते ऐकू यायचं. फार मोठ्यानं ती किंचाळायची, सकाळी- दुपारी संध्याकाळी मध्यरात्री केव्हाही. कमलच्या दर्दभरल्या किंकाळ्या काळजाचा ठाव घेत असत. खेडेगावच्या शुकशुकाटी वातावरणाला त्या छिन्न - विछिन्न करून टाकत. -- ओली जखम । ९३