Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ३ ]
युधिष्ठिराभिषेक.

२५


वेदिवरती भूपास उपाध्यायें
द्रौपदीतें बान्धवें कृष्णरायें ।
व्याघ्रचर्मावर यथोचित स्थानीं
बैसवीलें मन्त्रोक्त विधि करोनी ॥ ३० ॥
घृतें, मधुनें त्या राजदम्पतीला
उपाध्यायें अभ्यङ्गविधी केला ।
पंचपल्लव, सर्वोषधीहि कलशीं
पंचरत्नें जलिं घालुनियां तैशीं ॥ ३१ ॥
पूर्वसागरजल घेउनी क्रमानें
प्रोक्षियेलें उभयांसही विधीनें ।
"इमा आपः शिवतमा" आदिमन्त्रे
यथाशास्त्रागम-विहित विविधत ॥ ३२ ॥
जलें अभिषेक प्रथम सागराच्या
करुनि सलिलें मागुती नदनद्यांच्या ।
सकल धार्मिक संस्कार पूर्ण केला,
औपचारिक मग विधि प्रक्रमीला ॥ ३३ ॥
व्यासमुनिंनीं मग यथोचितस्थानीं
रत्नसिंहासनं तया बैसवोनी |
नवीं वस्त्रे उभयांस अर्पियेलीं,
आदरें तीं परिधान तिहीं केलीं ॥ ३४ ॥