Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग ३ ]
युधिष्ठिराभिषेक.

२३


पुरद्वारीं गज एक सजविलेला
धरुनि शुण्डाग्री माळ उभा ठेला ।
जवळ येतां भूपाळ संभ्रमानें
माळ तत्कण्ठीं घातली गजानें ॥ २० ॥
नवा मण्डप निर्मिला दिव्यवर्ण
स्तंभ रजताचे, त्यांवरी वितान ।
अतुल शोभा जणुं काय ती सुधर्मा
जया पाहुनि लाजला विश्वकर्मा ॥ २१ ॥
आठ दिक्पालां आठ दिशां ठाई
स्थान व्हावें ह्मणुनियां बहूपायीं ।
फुल्ल कमलाच्या आठ पाकळ्यांची
रम्य आकृति साधिली मण्डपाची ॥ २२ ॥
गर्भ रत्नासन नृपा कल्पियेलें
तेंहि कमलाकृति शिल्पकारिं केलें ।
मणिस्तंभावर घोंस मोतियांचे
नीलगगनीं तारकापुंज साचे ॥ २३ ॥
श्रौतकर्मास्तव वेदि अष्टकोनी
मध्यभागीं कल्पिली ऋत्विजांनीं ।
व्याघ्रचर्महि तिजवरी आंथरीलें
स्थान अभिषेकासाठिं तेथ केलें ॥ २४ ॥