Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
राज्यारोहण.

[ सर्ग २


डंके दणाण झडती, शङ्ख तुताच्या दणाणुनी देती ।
जणुं त्या निज-उच्च रखें पुकारिती रामविक्रमा पुढती ॥ १९ ॥
रामा विपद्विरामा नेत्रीं जनहो पहा ! तुह्मी याहो ! ।
या अर्थेच जणूं कां भेरींनीं फोडिला तदा टाहो ॥ २० ॥
रामाचा सुखसंक्रम व्हाया ज्या वाजल्या मधुर सनया ।
त्यांहींच रिझविले ते आले जे रामदर्शना घ्याया ॥ २१ ॥
नक्षत्री चंद्र जसा मत्रिगणीं शोभला तसा राम ।
बघतां त्यातें लोकां गमले की पूर्ण जाहले काम ॥ २२ ॥
साक्षत सुवर्णकुम्भा शिरिं घेउनि चालल्या पुढें कन्या ।
मोदकहस्तीं नरही शुभ-शकुन करीति त्या नृपा धन्या ॥ २३ ॥
पुढती चालति धेनू मूर्तचि पुण्यौघ तेंवि विप्रवर ।
श्रीरामातें त्यांचें पुरोगमत्वचि अमोघ भद्रकर ॥ २४ ॥
प्रत्येक गोपुरावर प्रत्येक चतुष्पथावरी दिव्य ।
इन्द्रधनुष्यासम तीं विलसलिं उत्तुङ्ग तोरणें भव्य ॥ २५ ॥
उभयत्र राजमार्गी गुड्या, पताका विचित्र रंगाच्या ।
द्वारीं प्रजाजनांनीं उभारिल्या सूचक स्वमोदाच्या ॥ २६ ॥
संमार्जन चांग करुनि आसेक सुवासिकें जलें करुनी ।
रेखूनि रंगवल्ली सजविलिं भवनाङ्गणेंहि गृहिणींनीं ॥ २७ ॥
श्रीरामा वन्दाया, अभिनन्दाया तयासि सामन्त ।
आले, तत्परिवारें गजबजले प्राज्य सर्व साकेत ॥ २८ ॥