Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सर्ग २ ]
रामाभिषेक.

१३


आनंदाची उकळी पौरमनीं तेधवां गमे फुटली |
चिरविरहानन्तर ती नाथा भेटावया पुरी नटली ॥ ९ ॥
आनंदी-आनंद प्रकट जनाच्या मुखावरी दिसला ।
की अन्तर्यामींचा भाव वदनदर्पणीं गमे वठला ॥ १० ॥
जाया वधूगृहाप्रति वर जेंवि निघे तसाच रामाचा ।
गमला स्वराजधानी - प्रवेश पौरां अपार मोदाचा ॥ ११ ॥
देदीप्यमान रविसा जोडियला दिव्य रथ सुमंत्रानें ।
आरोहण तथिं रामें केलें हरियुजिं जसें महेन्द्रानें ॥ १२ ॥
रश्मी धरित्या भरतें, शत्रुघ्झें छत्र नवनृपावरतीं ।
लक्ष्मण चामर वारी, चंवरी विलसे विभीषणाहातीं ॥ १३ ॥
प्रेमादरभावाचें भरतें आलें त्रिवर्गबन्धूतें ।
त्या बन्धुत्वा उपमा नोहे, त्यांचेंच साजलें त्यांतें ॥ १४ ॥
भूमण्डल दुमदुमलें ऐसा स्तुतिपाठ मांडिला ऋषिंनीं ।
तो आकाश कटाहहि घुमला अमरांचिया प्रशंसांनीं ॥ १५ ॥
शत्रुंजय नांवाच्या पर्वतशा तुंग कुंजरावरती ।
सुग्रीव महातेजा होई आरूढ वानराधिपती ॥ १६ ॥
तो कृष्णकुंजरावर पिङ्गट कपिराज जेधवां बसला ।
काळ्या खडकावर जणुं लोध्रद्रुम तो गमे जनां फुलला ॥ १७ ॥
मानवरूपा धरुनी, विभूषणीं भूषवूनि तनुयष्टी ।
इतर कपीहि निघाले बैसुनियां नवसहस्र गज- पृष्ठीं ॥ १८ ॥