Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥ रामाभिषेक ॥
सर्ग २.
( आर्या )

विजयश्रीनें लङ्का - रणरंगीं जानकीधवा वरिलें ।
सापत्न- मत्सराचें वारें तीच्या मनांत नच शिरलें ॥ १ ॥
श्रीरामाचे कण्ठीं जेव्हां रणरङ्गिं घातली माळा ।
तेव्हां तिनेंच सीता-रामसमागम सुयोग आणियला ॥ २ ॥
सीता, दुजी जयश्री हें भार्याद्वय सवेंच घेऊनी ।
राज्यश्रीस वया साकेता राम येइ परतूनी ॥ ३ ॥
वनवासाचे पूर्वी वाङ्निश्चित दशरथेंच ती केली ।
आतां परिग्रहातुर कंठित एकैक दिवस ती ठेली ॥ ४ ॥
येतांच अयोध्येच्या सन्निध सीतासमेत रघुनाथ ।
राज्यश्रीचे दूतचि सामोरे येति मत्रिजन, भरत ॥ ५ ॥
केले राज्यश्रीच्या स्वयंवराचे समग्र संभार ।
एकपतित्व धरेचें असतां कोठूनि वाण पडणार ? ॥ ६ ॥
श्रीरामा पूजिलें प्रेमपुरःसर गुरू वसिष्ठानें ।
सीमान्त पूजन चि तें केलें गमलें जनास संमानें ॥ ७ ॥
पुरवुनि पित्रातें निजप्रतिज्ञाभरास उतरोनी ।
केला स्वराजधानी-प्रवेश रामें चतुर्दशाब्दांनीं ॥ ८ ॥