Jump to content

पान:राज्यारोहण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥ इन्द्राभिषेक
सर्ग १.
( साकी. )

आनंदाचें भुवनचि जेथें सौख्य अखण्डित नांदे |
प्राणिमात्रही सदा विहरती ज्या लोकीं स्वच्छन्दें ॥ १ ॥
पूर्ण मनोरथ करिति कल्पतरु देउन वांछित तें तें ।
पवित्र मन्दाकिनी ज्या स्थलीं शांत करी तृष्णेतें ॥ २ ॥
ज्या सुखभुवनीं तारुण्याविण दुसरें वय नच ठावें ।
परंपरेच्या विहारकुतुकीं जेथें नित्य रमावें ॥ ३ ॥
कुसुमेंसुद्धां म्लान न होती, व्याधी कोठुनि येती ।
मरणाचें तर नांव कशाला ऐशी जीवित-रीती ॥ ४ ॥
अत्यानंदें मात्र अश्रुचे बिंदू नयनीं दिसती ।
गोडीच्या कलहाविण जेथें विरह कधीं नच होती ॥ ५ ॥
जिकडे तिकडे दाट लागती वनवृक्षांच्या राई |
शीतल छायेखालीं रमतीं मिथुनें ठाई ठाई ॥ ६॥
प्रसन्न निर्मल जलौघ वाहे कोठें सुंदर टाकीं ।
काञ्चनपद्मे नानापरिचीं फुलतीं उभय तटाकीं ॥ ७ ॥
माणिक मरकत - नील मण्यांचे पर्वत जागोजागीं ।
स्पृहा तयांची दिव्य लोकिं त्या करितो कोण अभागी ॥ ८ ॥