पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येत गेली तसतसे मी वेगवेगळ्या राज्यांतील हायकोर्टात जाऊन तेथील वकिलांसमोर 'शेतकऱ्यांची न्यायव्यवस्था समानतेची आहे काय?' या विषयावर भाषणे दिली.
 गमतीची गोष्ट अशी की, चक्रवर्तीसाहेबांनी ज्या दिवशी वरील गौप्यस्फोट केला त्याच्या आसपासच प्रसिद्ध मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना 'भारतरत्न' दिल्याचे जाहीर झाले.
 पण शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या किती जणांना पद्म पुरस्कार मिळाले याचा अभ्यास केल्यास शासनाचा शेतीक्षेत्राविषयीचा दुःस्वास स्पष्ट होऊन जातो. शेतीक्षेत्रामध्ये पद्म पुरस्कारपात्र शास्त्रज्ञ, शेतकरी झाले नाहीत असे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी प्रचंड कामगिरी करून दाखवली त्या सर छोटूराम यांच्यासारखे दिग्गज नेतेही शासनाच्या दृष्टीने पद्म पुरस्कारास पात्र ठरलेले नाहीत. सर छोटूराम हे स्वातंत्र्यपूर्व पंजाबमधील सुप्रसिद्ध शेतकरी नेते होते. त्यांनी स्थापन केलेल्या 'युनियनिस्ट पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची सत्ता पंजाबमध्ये अनेक वर्षे चालली. या पक्षाने हिंदू, शीख आणि मुसलमान यांची खऱ्या अर्थाने एकी करून दाखवली; इतक पक्की की सर छोटूराम हयात असेपर्यंत जिनांना पंजाबमध्ये पायसुद्धा ठेवता आला नाही. सर्वधर्मीयांची एकी घडवून आणणाऱ्या या पक्षाचे काँग्रेसशी कधी जुळले नाही. याही कारणाने सर छोटूराम यांना कोणताही पद्म पुरस्कार मिळाला नसण्याची शक्यता आहे.
 सर छोटूराम यांचा भारतातील स्थितीबद्दल अभ्यास गाढा होता. त्यांनी खुद्द महात्मा गांधींनाही दोन गोष्टींबद्दल प्रेमाची सूचना केली होती. पहिली सूचना अशी, की सार्वजनिक जीवनात धर्म आणला जाऊ नये. सर छोटूराम स्वतः आर्यसमाजी होते. पण ते म्हणत की मी माझ्या घराच्या चार भिंतींच्या आत आर्यसमाजी आहे, भिंतींच्या बाहेर पडल्यानंतर मला कोणताही धर्म नाही आणि जात नाही. या विचारामुळेच त्यांना युनियनिस्ट पार्टीचे यश संपादन करता आले. त्यांनी केलेली दुसरी सूचना अशी की, इंग्रजांनी अलीकडेच आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली आहे. इंग्रजांची भारताला ही फार मोठी देणगी आहे. तेव्हा महात्मा गांधींनी आंदोलनासाठी कोणताही मार्ग शोधावा, पण लोकांना कायदेभंग करायला शिकवू नये.

 सर छोटूराम यांनी जी मोठी कामे करून दाखवली त्यात शेतकऱ्याची जमीन कोणाही सावकारास काढून घेता येऊ नये अशी तरतूद असणारा कायदा Land Alienation Act त्यांनी पंजाबात संमत करून घेतला. गमतीची गोष्ट अशी की, लाला लजपत राय यांनी या कायद्यास प्रकट विरोध केला होता.

राखेखालचे निखारे / १०२