पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सर छोटूरामांची गोष्ट बाजूला ठेवूया, पण ज्यांनी १९६० ते १९७० या दशकात देशात घडून आलेल्या हरितक्रांतीचे बीज रोवले आणि देशाला अमेरिकेतून येणाऱ्या भिकेच्या मिंधेपणातून सोडवण्याचा मार्ग खुला केला त्या लालबहादूर शास्त्री यांना तरी 'भारतरत्न' देण्यात काहीच प्रत्यवाय नव्हता. लालबहादूर शास्त्री यांनी १९६५ साली 'जय जवान, जय किसान' ही घोषणा दिली. एवढेच नव्हे, तर अमेरिकेतील गव्हाची आयात बंद होण्याचा धोका पत्करून लोकांना आठवड्यात एक वेळचे जेवण न घेण्याचा सल्ला देऊन पाकिस्तानच्या आक्रमणाचा मुकाबला करण्याचे धाडस दाखवले. त्याशिवाय त्यांनी रोवलेल्या हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज भूतकाळात होऊन गेलेल्या अनेक पंतप्रधानांना भारतरत्न न मिळाल्याबद्दल आरडाओरड होते आहे, पण लालबहादूर शास्त्रींचे नाव या आरडाओरडीतही कुठे येत नाही. याचे कारण ते शेतकरी समाजाचे नेते होते हेच असावे.
 लालबहादूर शास्त्री हे राजकारणी व्यक्ती म्हणून त्यांची गोष्ट बाजूस ठेवली तरी वेगवेगळ्या वनस्पतींच्या जातिप्रजाती शोधून काढणारे अनेक शेतकरी, शास्त्रज्ञ गावोगाव अंधारात लोपले आहेत. सर्व हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारे आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यात मोठा वाटा उचलणारे डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना सर्व काही आदरस्थाने मिळाली, पण त्यांना कधी भारतरत्न पुरस्कारास पात्र समजले गेले नाही.
 सर्व देशांतील शेतकऱ्यांविषयी समाजाची आणि सरकारची जी द्वेषभावना आहे तिचे कारण काय? कदाचित देशातील प्रचलित जातिव्यवस्था हे त्यामागील एक कारण असू शकेल; पण एवढ्या कारणाने एका सबंध समाजाला कर्जाच्या नरकात खितपत ठेवण्याची शिक्षा देणे फारच अन्यायाचे होते.

(दै. लोकसत्ता दि. २५ डिसेंबर २०१३ )

राखेखालचे निखारे / १०३