पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटा आणि नोकऱ्यातील हिस्सा याबद्दल ढिंढोरा पिटो, पण आजच्या परिस्थितीत विदर्भात पिकणारा कापूस आणि विदर्भात सापडणारी कोळसा, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजसंपत्ती कोणत्या व्यापारी शर्तीवर महाराष्ट्राला उपलब्ध होते, ही बाब जास्त महत्त्वाची आहे. फक्त कापसाचाच विषय घेतला तरी त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्याचे झालेले नुकसान हे ४० हजार कोटी रुपयांच्या वर आहे. याच प्रमाणात इतर उत्पादने व खनिजांच्या लुटीमुळे विदर्भाच्या होणाऱ्या हानीचा अंदाज लावता येईल.सगळ्या हिंदुस्थानात बांधल्या जाणाऱ्या इमारतीतील निदान दहा टक्के इमारती विदर्भात तयार होणाऱ्या सिमेंटने बांधल्या जातात. महाराष्ट्रातील सर्व कारखाने विदर्भात कोळशाच्या आधारे निर्माण होणाऱ्या विद्युत ऊर्जेवर चालतात. या सर्वांच्या बदल्यात विदर्भाच्या तोंडाला पानेच पुसली जातात. महाराष्ट्रात वापरली जाणारी वीज विदर्भाची, पण विदर्भाच्या नशिबी मात्र कायमचे लोडशेडिंग अशी ही तिरपागडी व्यवस्था आहे.
 विदर्भाची परंपरा आणि संस्कृती लक्षात घेता वसाहतवाद आणि समाजवाद यांच्या आधाराने तयार झालेली गुंडगिरीची व्यवस्था विदर्भास मानवणारी नाही. जुन्या काळापासून सुसंस्कृत लोकांचा देश म्हणून साहित्यात ख्यातनाम असलेल्या या प्रदेशाला त्या वैदर्भीय संस्कृतीस अनुरूप अशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था असणारा विदर्भ तयार करणे आवश्यक आहे. व्यवस्थेच्या दृष्टीने देशात छोटी राज्ये असावीत ही कल्पना चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी मांडली. या त्यांच्या कल्पनेला साकार करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १९९६ मध्ये विदर्भात बळीराज्याची स्थापना करण्यात यावी ही मागणी करण्यात आली.

 विदर्भाचा कोंडमारा फार जुना आहे. ५३ वर्षांपूर्वी मुक्तीच्या आशेने विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, पण ती आशा फोल ठरली आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी म्हणजे महाराष्ट्रद्वेष आहे असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. इंग्रजांचे राज्य होण्याआधी विदर्भ हैदराबादच्या निझामाच्या ताब्यात होता. इंग्रजांनी त्यांचा येथे जम बसल्यावर विदर्भाचे जिल्हे निझामाकडून भाडेपट्ट्याने घेऊन ते मध्य प्रांताला जोडले. भारत स्वतंत्र झाल्यावर विदर्भाच्या जनतेला भीती वाटली, की भाडेपट्ट्याचा करार संपून पुन्हा आपल्यावर निझामाची जुलमी राजवट चालू होईल आणि त्यातूनच महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या कितीतरी आधी स्वतंत्र विदर्भाची चळवळ सुरू झाली. स्वातंत्र्योत्तर काळात राज्य पुनर्रचनेसंबंधी नियुक्त केल्या गेलेल्या प्रत्येक समितीने आणि आयोगाने स्वतंत्र विदर्भाच्या

राखेखालचे निखारे / ९७