पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथालयात जाऊन शेतकऱ्यांच्या शोषणासंबंधातील पुरावे आणि माहिती गोळा करणे हे तसे सोपे होते. शेतीतील काबाडकष्टांच्या तुलनेने ग्रंथालयातील खुर्चीत बसून पुस्तके वाचणे, टिपणे काढणे हे काम सोपेच म्हणायचे. त्यात मला थोडी नशिबाची साथ मिळाली. रशियामध्ये स्टॅलिनच्या काळात प्रियाब्रेझेन्स्की आणि बुखारीन यांच्यात झालेल्या वादविवादाची माहिती मला अशोक मित्रा यांच्या Terms of Trade and Class Relations या छोट्या पुस्तकात मिळाली. बहुतेक विद्वानांना आणि संशोधकांना अशा नशिबाच्या लाटेचा फायदा मिळतोच. माझी मांडणी कोणाही मायकेल लिप्टनसारख्या एखाद्या लेखकाच्या मांडणीवर झालेली नसून त्यासाठी अनेक संदर्भ आणि माझे शेतीतील अनुभव उपयोगी पडले आहेत. आणि त्याखेरीज माझ्या व्यापक वाचनाचाही - त्यात अनेक विषय आले, अनेक भाषांचा अभ्यासही आला - मला उपयोग झाला. तसेच फ्रान्ससारख्या देशातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या आंदोलनाचा अनुभवही त्याच्या मागे आहे. आणि त्यातून शेतकरी संघटनेच्या अर्थविचाराची मांडणी आणि आंदोलनाची साधने तयार झाली. अंगारमळ्याच्या शेतातील एका ठिकाणी उभे राहून मला किड्याकीटकांची माहिती देणाऱ्या आणि जमिनीची पातळी कशी काढावी याचे व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या त्या छोट्याशा मुलांना त्यांनी पुरवलेल्या या किरकोळ माहितीतून पुढे शेतकरी संघटनेचा महावृक्ष उभा राहील, अशी शंकाही वाटली नसेल. शेतकरी संघटनेच्या विचाराची विशेषतः अशी की कांद्याच्या भावाच्या प्रश्नापासून ते विश्वाचा निर्मिक कोण, त्याचे स्वरूप काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, कोणत्याही तहेची ठिगळे न वापरता एका धाग्याने विणलेले ते एक महावस्त्र आहे.

(दै. लोकसत्ता दि. ६ नोव्हेंबर २०१३ )

राखेखालचे निखारे / ९५