पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. सरकारी नोकरीत राहिल्यामुळे कलेक्टर इत्यादी उच्चपदस्थ लोकसुद्धा पहिल्या पगाराचा अशाच तऱ्हेने विनियोग करू पाहतात हेही मला अनुभवाने कळले होते. मग शेतकऱ्यांनी त्यांची नवी मिळकत आनंदाच्या भरात थोडीशी उधळमाधळीने गैरवापराने खर्च केली तर त्याबद्दल एवढे आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नाही.
 हाच युक्तिवाद, 'शेतकरी लग्नात किंवा उत्सवप्रसंगी अवास्तव खर्च करतात' या दोषारोपाची वासलात लावण्याकरिता उपयोगी पडला. त्यासाठी तर प्रत्यक्ष महात्मा जोतिबा फुले यांचाच आधार होता. अगदी श्रीमंत म्हटल्या गेलेल्या पाटलाच्या घरीसुद्धा लग्नासारख्या प्रसंगी जेवणावळ म्हणजे काय असते याचे तपशीलवार वर्णन जोतिबांनी बारकाईने केले आहे... देवकार्याचे दिवशी सर्वानी आपापल्या घरून पितळ्या घेऊन आल्यानंतर त्यामध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगऱ्याबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्ये दर एकाच्या पितळीत एकदा चार अथवा पांच आंतडी-बरगड्याचे रवे पडले म्हणजे जेवणारांचें भाग्य..' असे स्वतः जोतिबा फुल्यांनीच 'शेतकऱ्याचा आसूड' या त्यांच्या पुस्तकात वर्णन केले आहे.
 शेतकऱ्यांतील अगदी लहान मुलानेसुद्धा दाखवलेल्या सामान्यज्ञानानंतर माझ्या मनात विचार आला की आयएएसच्या परीक्षेतील सामान्यज्ञानाचे प्रश्न थोडे शेतीसंबंधित केले तर आज उत्तीर्ण होणारे बहुतेक अधिकारी सपशेल अपयशी होतील. परीक्षेतील उत्तीर्णता ही प्रश्नांच्या कलावर अवलंबून असते. प्रश्न जर या एकाच प्रकाराने विचारले गेले तर शेतकरी मुले सहज उत्तीर्ण होतील, हा निष्कर्षही मनात तयार झाला. यापुढची पायरी म्हणजे, कोणत्या गुणवत्तेच्या निष्कर्षांने कलेक्टर इत्यादी उच्चाधिकाऱ्यांची नेमणूक होते? त्यात खरोखर त्यांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा होते काय? माझ्या मनात एक गमतीशीर विचार आला. सगळ्यात जास्त बुद्धी वापरण्याचे काम बसचा कंडक्टर करतो असा तो निष्कर्ष होता. एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर जाण्याकरिता प्रत्येक वेळी वेगळा हिशेब मनातल्या मनात त्याला करावा लागतो. माझी सगळी दुनिया पालटली. शेतकरी अडाणी आहे, आळशी आहे, उधळ्या आहे, व्यसनी आहे या साऱ्या कल्पना पार पुसून गेल्या आणि शेतकऱ्याचे वासाहतिक पद्धतीने शोषण होत असल्यामुळेच तो गरीब राहतो, कर्जबाजारी राहतो, असा मनाशी निश्चय झाला.

 यानंतरचे काम हे केवळ पुस्तकी होते. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या

राखेखालचे निखारे / ९४