पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माहीत आहेत.
  त्यानंतर सगळ्या शेताचे कंटूर मॅपिंग करण्याचे काम हाती घेतले गेले. यासाठी जागोजाग बांबू खोचून काही उपकरणांच्या मदतीने बांबूंची टोके समपातळीत आणावी लागतात. शेतावर काम करणारा एक मुलगा म्हणाला, यासाठी एवढ्या उपकरणांची काय गरज आहे? खाली वाकून पाहिल्यावर जमिनीची पातळी सहज लक्षात येते. तो मुलगा एका जागी उभा राहिला आणि खांदा कलवून डोके जमिनीच्या पातळीत आणून त्याने, तेथे पाणी सोडले तर कोणत्या दिशेने वाहत जाईल हे सांगितले. त्या वेळी मला सल्ला देण्याकरिता किर्लोस्कर कंपनीचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनीही त्या मुलाला सर्टिफिकेट दिले की त्या मुलाने काढलेल्या जमिनीच्या पातळीत काहीही दोष नव्हता. त्यामुळे पाण्याच्या वाहण्यावरून जमिनीची पातळी सहज काढता येऊ शकते हे कळले.
 या उदाहरणांवरून मला श्रीमती ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली. त्यांच्या शाळेच्या तपासणीसाठी काही विद्वान गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचे काही प्रश्न विचारले - अमक्या खात्याचा मंत्री कोण? वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांना उत्तरे देणे फारसे जमले नाही. ताराबाईंनी हा सगळा प्रकार पाहून घेतला आणि तपासनिसांकडून जेवणाच्या सुटीपर्यंत वेळ मागून घेतला. सुटीच्या वेळात त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून आणण्यास सांगितले. पाने गोळा झाल्यानंतर त्यांनी एकेका विद्वान तज्ज्ञाला ही पाने कोणकोणत्या झाडांची आहेत असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. विद्वान तज्ज्ञ अर्थातच गडबडून गेले. याउलट, ताराबाईंच्या विद्यार्थ्यांना त्या-त्या पानाच्या झाडाचे नाव एवढेच नाही, तर त्या झाडांचे औषधी गुणही तोंडपाठ होते.
 यावरून एक महत्त्वाचा धडा मी शिकलो आणि मनात कोठेतरी त्याची नोंद करून घेतली. शेतकरी हा अडाणी आणि अज्ञानी असतो ही गोष्ट खोटी आहे हा युक्तिवाद करण्याकरिता पुढे मला हे शहाणपण खूप उपयोगी पडले.

 शेतकरी संघटना स्थापन झाल्यानंतर अनेक विद्वानांनी माझ्याशी वादविवाद करण्याकरिता अनर्गळ मुद्दे उठवले- शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला तर ते त्याचा उपयोग दारू पिण्याकरिता करतील वगैरे वगैरे. माझ्या अनुभवातून जे मला कळले होते ते हे की उत्पन्न वाढल्यानंतर सगळेच लोक काही हौसमौज करण्याकरिता त्याचा एक भाग वापरतात; त्यातल्या काहींना दारू पिण्यात हौसमौज वाटते. प्राध्यापकांचीही अशी प्रवृत्ती मला प्रत्यक्ष अनुभवाने कळलेली

राखेखालचे निखारे / ९३