पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





अंगारमळ्याचे धडे


 सन १९७६ च्या डिसेंबर महिन्यात शेवटी आंबेठाणच्या जमिनीचा व्यवहार ठरला. पुण्यातील एक वकील एम. पी. गुणाजी यांनी साठेखत तयार करून दिले आणि १ जानेवारी १९७७ रोजी अंगारमळ्याची जमीन ताब्यात घेण्याचा विधी पार पडला. हा विधी म्हणजे जुन्या मालकाने जमिनीतील थोडीशी माती उचलून नव्या मालकाच्या हातात देणे इतका साधासोपा असतो. त्यानंतर जमीन नव्या मालकाची होते आणि तो त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास मुखत्यार होऊन जातो.
 मला जमिनीचे काम करण्याची इतकी घाई होती की पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी १९७७ रोजी आम्ही बांधबंदिस्तीच्या कामास सुरुवात केली. बांधबंदिस्ती आवश्यक होती, कारण अंगारमळ्याची सर्व जमीन ही दोन्ही बाजूंनी उताराची होती आणि दोन्ही उतारांच्या मध्ये एक ओढा वाहत होता. त्या उतारावर शेतजमीन करण्यासाठी जागोजाग बांध घालणे आवश्यक होते. प्रत्येक पावसात वाहून येणारे पाणी आणि माती बांधापाशी साठत जाते आणि जमिनीचे आपोआप सपाटीकरण होते. बांध घालण्याचे काम तसे सोपेच आहे. बांधाच्या रेषेच्या एका बाजूस जमीन खणून घ्यायची आणि त्यातून निघणारी माती रेषेच्या दुसऱ्या बाजूला टाकायची. या कामात सर्वात मोठे काम हे खणण्याचे असते.

 खणण्याचे काम चालू झाल्यावर जमिनीतून अनेक प्रकारचे किडे आणि कीटक निघू लागले. माझी या जगाशी काहीच ओळख नव्हती. माझ्या मनात विचार आला की या किड्याकीटकांचा एक संग्रह करावा आणि प्रत्येक किड्याकीटकाचे नाव तेथे लिहून ठेवावे. माझ्या शेजारीच जमिनीचे जुने मालक हजर होते, त्यांना मी तसे म्हणताच ते म्हणाले अशा तहेचे संग्रहालय करण्याची काहीच आवश्यकता नाही. गावातल्या अगदी लहान मुलालासुद्धा या प्रत्येक किड्याचे आणि कीटकाचे नाव माहीत आहे, एवढेच नव्हे तर गुणधर्मसुद्धा

राखेखालचे निखारे / ९२