पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरिबांच्या छातीवर बसून राहून गरिबी दूर होऊ शकत नाही, तुम्ही त्यांच्या छातीवरून उठा म्हणजे गरिबी आपोआप नष्ट होते किंवा नाही ते पाहा.' इतका दूरदर्शी राष्ट्रपिता लाभलेल्या देशात 'गरिबी हटाव' या घोषणेखाली निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या जाव्यात, अब्जावधी रुपयांच्या योजना राबवण्यात याव्यात, पण प्रत्यक्षात गरिबीमध्ये अंशमात्रही फरक पडू नये अशी स्थिती आहे. प्रश्न असा पडतो की हे अब्जावधी रुपये गेले कोठे? याचे उत्तर भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेल्या आजच्या युगात शोधणे कठीण नाही.
 उद्योगधंदे आणि गुंतवणूक या क्षेत्रांत आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविण्याची मनमोहन सिंग यांनी सुरुवात केली, कारण त्यासाठी ज्या योजना कराव्या लागणार होत्या, त्यात मंत्रालयातील सर्व मंडळींना आपापल्या चोची बुडवून घेण्याची शक्यता होती. शेतीमध्ये विकास करण्यासाठी अशा तऱ्हेच्या कोणत्याच यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता नव्हती. सरकार जेथे जेथे हस्तक्षेप करून शेती तोट्यात घालण्याचा उद्योग करते तेवढे उद्योग बंद केले तरी शेती, तिच्यातील गुणाकाराच्या अंगभूत गुणधर्माप्रमाणे, विकासदरामध्ये मोठा बदल घडवून आणू शकते.
 यात सरकारने करण्यासारख्या किमान गोष्टी कोणत्या?

 १. परदेशी थेट गुंतवणूक (FDI) आल्यानंतर तिचा मोठ्या प्रमाणात उपयोग शेती आणि बाजारपेठ यांच्यातील संरचना सुधारण्याकरिता कसा होतो हे कसोशीने पाहिले पाहिजे. २. कोणत्याही परिस्थितीमध्ये कापूस, साखर, कांदा अशा शेतीमालांवर निर्यातबंदी घातली जाता कामा नये. अचानक निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते व निर्यातदार व्यापाऱ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पत नाहीशी होऊन त्यांना भारतीय मालाकरिता पुन्हा बाजारपेठ तयार करणे अशक्य होऊन जाते. ३. दुर्दैवाची गोष्ट अशी, की आजही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, फार काय, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातसुद्धा शेतीमाल घेऊन जाण्यावर निर्बंध आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करा, असे सारे पुढारी लोक सांगतात; पण अगदी कापसावर प्रक्रिया करण्यासही बंधने आहेत. शेतीमालाची वाहतूक व प्रक्रिया यावरील सर्व निर्बंध रद्द करणे. ४. शेतात पिकलेले अन्नधान्य, विशेषतः फळे व भाजीपाला हा नाशवंत माल असल्यामुळे त्याची कालमर्यादा अल्प असते. याकरिता अन्नधान्याच्या साठवणुकीकरिता सुसज्ज गोदामे तसेच शीतगृहे आणि शीत वाहतुकीची व्यवस्थाही करावी लागेल. थोडक्यात, डॉ. कुरियन यांनी श्वेतक्रांतीसाठी ज्या तऱ्हेची संरचना

राखेखालचे निखारे / ५९