पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





शेतीमुक्तीचा उंच झोका


 जून महिना जवळ येऊ लागला म्हणजे 'नेमेचि येतो मग पावसाळा' या हिशेबाप्रमाणे पावसाच्या आगमनासंबंधी चर्चा सुरू होतात. हवामान खात्याच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाने यंदा जून महिन्याच्या ४ तारखेला मोसमी पाऊस केरळात पोहोचेल आणि हंगामभरात सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता आणि लगेच जपानी हवामानतज्ज्ञांनी केरळातील आगमनाच्या भाकिताबद्दल शंका व्यक्त केली; वर महाराष्ट्रात यंदा पाऊसमान सरासरीपेक्षा कमीच राहील अशी शक्यता वर्तवली होती. देशी-विदेशी हवामानतज्ज्ञांच्या अंदाजांना हुलकावणी देत मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधीच, ३ जूनलाच केरळला ओलांडून कोकणच्या किनाऱ्यावर दाखलही झाला.
 पावसाविषयीचे अंदाज नेहमी सरासरीपेक्षा इतके टक्के कमी किंवा सरासरीपेक्षा इतके टक्के जास्त असे वर्तवले जातात. पावसासंबंधी काही लोक सट्टाही लावतात. शेतकऱ्यांना या टक्केवारीत किंवा सट्टेबाजीत काही स्वारस्य नसते. त्यांच्या दृष्टीने एकूण पाऊस किती पडतो याला जितके महत्त्व असते, तितकेच किंबहुना त्याहून जास्त महत्त्व पडणाऱ्या त्या पावसाचे पावसाळाभराच्या काळात वाटप कसे होते याला असते. ज्या पिकाला ज्या वेळी पाऊस पडायला हवा, त्या वेळी तो पडला तर काही उपयोग; अन्यथा, काही वेळा नको तेव्हा पाऊस पडला, तरी सरासरी बिघडत नाही, पण शेतकऱ्याचे सगळे हिशेब मात्र चुकतात.

 उदाहरणार्थ, महाराष्ट्रात खरिपाच्या हंगामात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे एक मोठे विचित्र पीक आहे. सुरुवातीला रोपे तरारून वर येईपर्यंत त्याला चांगला पाऊस हवा असतो. एकदा का जमिनीखाली बटाटे धरू लागले की मात्र पाऊस जास्त झाला तर बटाटे खराब होऊ लागतात. म्हणून जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडावा म्हणून शेतकरी आकाशाकडे डोळे लावतो आणि जेव्हा नको असेल तेव्हा पाऊसबाबाने पडू नये म्हणून तो प्रार्थना करतो. थोडक्यात, पावसाच्या या जुगारात पीक वाचण्याची शक्यता खूपच

राखेखालचे निखारे / ५७