पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संवेदनापटल ही व्यक्तीला मिळालेली देणगी आहे. तिच्यावर वाटेल ती गणिते होऊ शकतात, पण सामूहिक संवेदनापटल बनण्याची काही सोय निसर्गाने केलेली नाही. अर्थशास्त्रज्ञांचा निष्कर्ष असा की, श्रीमंतांकडून पैसे काढून घेतले आणि ते गरिबांना दिले तर समाजातील एकूण आनंद आणि सुख वाढते. आपला हा सिद्धान्त रेटून नेण्याकरिता काही गणिती डोक्याच्या अर्थशास्त्रज्ञांनी गुंतागुंतीचे गणित (indifference curves) मांडण्याचे प्रयत्न केले, पण ते काही यशस्वी झाले नाहीत. संपत्तिवाटपाचे जे मूलभूत सिद्धान्त आहेत त्यातील एक असा आहे की, प्रत्येक माणसाला मग तो मजूर असो का उद्योजक त्याने केलेल्या श्रमानुसार, गुंतवणुकीनुसार, प्रज्ञेनुसार आणि पत्करलेल्या धोक्यानुसार मोबदला मिळाला पाहिजे. अलीकडच्या काळात या विचारापलीकडे जाऊन एक नवीन कलाटणी देण्यात आली आहे.
 निवडणुकीच्या वेळी किंवा एरवीही सरकारी खजिन्यातून खर्च करून गरिबांचे भले करण्याच्या योजना मांडल्या, तर त्यातून सत्तासंपादनाचा मार्ग सुलभ होतो हे लक्षात आल्याने निवडणुकीच्या वेळी लुगडी, भांडी, दारूच्या बाटल्या इत्यादी वाटणे आणि निवडणुकीनंतरही काही निवडक समाजाला स्वस्त अन्नधान्य किंवा नोकऱ्यांत अग्रक्रम अशा तऱ्हेची आश्वासने देऊन खुलेआम मते विकत घेतली जाऊ लागली. या अनुभवातून 'आम आदमी' वाद, सरसकट अनुदाने वाटण्याची पद्धत चालू झाली आहे. यातील कोणतीही पद्धती टिकणारी नाही, कारण ती शास्त्रीय नाही; कोणाही व्यक्तीच्या संवेदनापटलावर ती आधारलेली नाही. कदाचित राज्यकर्त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचे संवेदनापटल या तऱ्हेच्या अर्थव्यवस्था सुचवीत असेल; एरवी त्याला काही आधार नाही. समाजवादी अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या देशांत हुकूमशाही तयार झाली आणि त्या हुकूमशहांनी लाखो-करोडो लोकांचे बळी घेतले हा इतिहास अनुभवास आलेला आहे. कोणत्याही स्वरूपातील कल्याणकारी राज्य काय किंवा 'आम आदमी'वादी राज्य काय, ही सर्व समाजवादाचीच पिलावळ आहे. अशा व्यवस्थेत झालेले निर्णय शेवटी लक्षावधी लोकांच्या मृत्यूस कारण ठरून अपरिहार्यपणे प्रचंड शोकांतिका निर्माण करतील हे निश्चित.

(दै. लोकसत्ता दि. २९ मे २०१३ )

राखेखालचे निखारे / ५६