पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पाच-दहा विद्यार्थी हाच निर्णय करायला बसले तर तो निर्णय कसा होईल? त्या विद्यार्थ्यांपकी एखादा कोणी तरी बऱ्यापैकी घरातील असेल, जेवणाचे पैसेही देणार असतो किंवा सिनेमाची तिकिटेही काढणार असतो किंवा इतर काही कारणाने जो विद्यार्थ्यांत प्रभुत्व ठेवून असतो तो आपला निर्णय सर्वाकडून मान्य करून घेतो. समाजवादी व्यवस्थांमध्ये कोणत्या ना कोणत्या पायरीवर हुकूमशाही राज्य आले हा काही अपघात नव्हता. सामूहिक निर्णयाची प्रक्रिया कोणत्याही संवेदनापटलावर आधारलेली नसल्यामुळे ती मूलत: अशास्त्रीयच असते. यावरून ॲरो (Arrow) या अर्थशास्त्रज्ञाने सिद्धान्त मांडला की, सामूहिक निर्णय हे तद्दन चुकीचेच असतात, कारण त्यांना कोणत्याही संवेदनापटलाचा आधार नसतो, त्यांनी केलेले निर्णय हे अंततोगत्वा अनमान धबक्याचेच (Arbitrary) असतात.
 या संवेदनापटलाचे काही गुण सांगण्यासारखे आहेत. या पटलाच्या अँटेना या त्या-त्या व्यक्तीच्या सर्व ज्ञानेंद्रियांपर्यंत पोहोचलेल्या असतात. भाजी विकणारी बाई आणि भाजी विकत घेणारा ग्राहक यांच्यातील घासाघिशीच्या चर्चेतसुद्धा विक्रेता आणि खरेदीदार यांना एकमेकांच्या मनातील त्या वस्तूची नेमकी निकड किती आहे याचा साधारण अंदाज येतो. खरीददार त्यासाठी किती पैसे देण्यास तयार होईल व विक्रेता किती किमतीपर्यंत खाली उतरेल याचे साधारण अचूक अंदाज दोन्ही पक्ष मांडत असतात. सगळी बाजारपेठ ही संवेदनापटलाच्या या चमत्काराने चाललेली आहे. हाच ॲडम स्मिथचा 'अदृश्य हात' असावा.
 नियोजन मंडळांचे निर्णय नेहमीच चुकतात आणि सर्वसाधारण नागरिक मात्र जास्त चांगले निर्णय घेतात. याचे कारण असे की, नियोजन मंडळांच्या कपाटात आणि गणकयंत्रांमध्ये ढिगांनी अहवाल आणि माहित्या उपलब्ध असतात, परंतु त्या माहित्या आपल्या संवेदनापटलावर उतरवण्याचे काम करणारा कोणीच नसतो, त्यामुळे नियोजन मंडळांच्या निर्णयात कोणाचेही संवेदनापटल उतरतच नाही. माणसाला भूक लागते तेव्हा भाकरीच्या पहिल्या तुकड्याकरिता तो अगदी जीव टाकायला तयार होतो, पण भाकरीचा एकेक तुकडा जसजसा पोटात जाईल तसतशी भुकेची व्याकुळता कमी कमी होत जाते.

 ही केवळ व्यक्तिगत अनुभवाची आणि संवेदनापटलाची बाब आहे. दुर्दैवाने, काही अर्थशास्त्रज्ञांनी तिला सामाजिक रूप दिले आणि ज्याच्याकडे एक भाकरीही नाही त्याची गरज ज्यांनी दोन-तीन भाकऱ्या आधीच खाल्ल्या आहेत त्यांच्यापेक्षा अधिक तीव्र आहे, असा दोन संवेदनापटलांची तुलना करणारा निष्कर्ष काढला.

राखेखालचे निखारे / ५५