पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टोलेजंग इमारतीत कार्यालये थाटून बसलेल्या नियोजन मंडळांना का जमत नाही? ॲडम स्मिथचा 'अदृश्य हात' बाजारपेठेत काम करतो, नियोजन मंडळाच्या आवारात त्याची जादू का चालत नाही?
 लॉयेनेल रॉबिन्स याने अर्थशास्त्राची व्याख्या करताना मांडणी केली ती अशी - माणसाच्या गरजा अनेक असतात. दुर्दैवाने त्याच्याकडील साधने त्या मानाने तुटपुंजी असतात. सांत साधने अनंत इच्छांवर कशा तऱ्हेने वाटावीत यासंबंधी मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र.
 हे सगळे कोडे उलगडण्याकरिता एक सोपे उदाहरण घेऊ. शहरातील वसतिगृहात एक शेतकरी मुलगा राहायला आला आहे. त्याचे आई-बाप त्याला मोठ्या कष्टाने महिनाभराच्या खर्चासाठी पन्नास रुपये पाठवू शकतात. या विद्यार्थ्याला शहरात आल्यानंतर व तेथील झगमगाट पाहिल्यानंतर काही हौसमौज करावी, सिनेमा पाहावा अशी इच्छा असते, पण त्याबरोबरच अभ्यास करावा व आई-बापांना समाधान वाटेल असे काही तरी करून दाखवावे हीही इच्छा प्रबळ असते. विद्यार्थ्यांपुढे तीनच महत्त्वाचे खर्च आहेत असे धरू. एक- अभ्यासाकरिता पुस्तके घेणे. दुसरे- जेवण करणे आणि तिसरे- सिनेमासाठी खर्च करणे.

 त्याला आई-बापांकडून मिळणाऱ्या ५० रुपयांची विभागणी त्याने या तीन खर्चावर कशी काय करावी? तत्त्वतः हाच प्रश्न सर्व नियोजन मंडळे सोडवत असतात आणि मोठमोठ्या आर्थिक कंपन्याही सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. सांत साधनांचे वाटप अनंत गरजांवर कसे करावे, हा प्रश्न सोडवणे सर्वसाधारण विद्यार्थ्यांस जड जात नाही. त्याचे कारण असे की, त्याला जन्मतःच एक अद्भुत संवेदनापटल मिळालेले असते. या संवेदनापटलावर, आज निर्णयाच्या वेळी त्याच्या पोटात भूक किती आहे, अभ्यासाची निकड किती आहे आणि सिनेमा पाहाण्याचा निर्णय घेतला तर सिनेमा पाहण्यातून होणारा आनंद किती असेल या वेगवेगळ्या संवेदनांची एकत्र नोंद होते. एवढेच नव्हे तर हे अद्भुत संवेदनापटल या वेगवेगळ्या संवेदनांची बेरीज-वजाबाकी, अगदी गुणाकारभागाकारही करू शकते. शेवटी तो विद्यार्थी जेवायला जावे, पुस्तके घ्यावी का सिनेमाला जावे हा निर्णय करतो. हा निर्णय तो एकटा करू शकतो, वसतिगृहातील पाच-दहा विद्यार्थी एकत्र आले तर त्यांना हा निर्णय करणे शक्य होणार नाही, कारण संवेदनापटलाची अद्भुत देणगी फक्त एका व्यक्तीस मिळालेली आहे, ती कोणत्याही समूहास मिळालेली नाही.

राखेखालचे निखारे / ५४