पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


'कल्याणकारी राज्य, आम आदमी' अर्थव्यवस्था....


 कोणतीही अर्थव्यवस्था म्हटली की, त्यात अनेक व्यावसायिक, उद्योजक, मध्यस्थ, प्रक्रिया करणारे इत्यादी इत्यादी एकत्र येऊन ग्राहकांच्या गरजा अपुऱ्या करण्याचा प्रयत्न करतात.
 याचे उदाहरण देण्यासाठी खुल्या अर्थव्यवस्थेचा आद्यजनक ॲडम स्मिथ याने साध्या, पाव भाजणाऱ्या बेकरचे उदाहरण घेतले आहे. बेकर पाव तयार करण्याकरिता लागणारा आटा शेतकऱ्याकडून बाजारातून वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत मिळवतो व त्यापासून पाव तयार करतो. तो पाव तयार करतो आणि बाजारात विकतो ते काही कोणावर उपकार करण्याच्या बुद्धीने नव्हे, तर स्वतःचे पोट भरावे व आपल्या कुटुंबाच्या गरजा पुऱ्या व्हाव्यात या उद्देशाने तो बाजारात उतरतो. गंमत अशी की, शेतकऱ्यापासून ते बाजारपेठेतील साऱ्या घटकांपर्यंत प्रत्येकाची मनोभूमिका हीच असते. कोणीही दुसऱ्या कोणावर उपकार करण्याच्या बुद्धीने बाजारात येत नाही. तसे असते तर मोठा गोंधळ उडाला असता. 'अ'ने 'ब'चे कल्याण करायचे, 'ब'ने 'क'चे कल्याण करायचे अशी कल्याणकर्त्यांची रांगच्या रांग लागून गेली असती आणि ग्राहकांच्याही गरजा पुऱ्या झाल्या नसत्या.

 ही सगळी काय गंमत आहे? अर्थव्यवस्थेतील ही वेगवेगळी दातेरी चाके एकमेकांत गुंफून फिरतात कशी? याचे उत्तर स्वतः ॲडम स्मिथने मोठ्या गूढ शब्दांत दिले आहे. एक अदृश्य हात (invisible hand) या वेगवेगळ्या घटकांत समन्वय घडवून आणतो, असे त्याने उत्तर दिले. दुर्दैव असे की, या अदृश्य 'हाता'चे रहस्य उकलण्याचा फारसा काही प्रयत्न झाला नाही. अर्थशास्त्रात उत्पादनाचे सिद्धान्त तयार झाले, उत्पादनांच्या वाटपाचे सिद्धान्त तयार झाले; सगळ्या देशांतील अर्थव्यवस्था अधिक उत्पादक कशी बनावी याचेही सिद्धान्त तयार झाले, पण अद्यापही एका मोठ्या रहस्याचा उलगडा झालेला नाही. जो निर्णय घरातील गृहिणी किंवा बाजारातील पाववाला घेतात ते निर्णय मोठमोठ्या

राखेखालचे निखारे / ५३