पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्याआधी त्यांनी काही वेगवेगळ्या समाजांचा तौलनिक अभ्यास केला होता असा काही पुरावा सापडत नाही, किंबहुना कामगार क्षेत्र त्यांनी जाणीवपूर्वक कार्यक्षेत्र म्हणून निवडले असेही काही दिसत नाही. जन्माच्या अपघाताने त्यांना कामगार क्षेत्र मिळाले व तेच त्यांनी जोपासले. याच पुढारीवर्गात हिंदुत्व, मराठीपण किंवा आपापल्या जातीचा अभिमान जोपासण्याचा बाणा हे सर्व धरले पाहिजे. राष्ट्राची प्रगती झाली तर आपल्या समाजाची उन्नती होते किंवा नाही, होत असली तर ती त्याच प्रमाणात आणि दिशेने होते किंवा नाही, असा विवेचक अभ्यास करणारे पुढारी अपवादानेच सापडतील. हिंदू जन्माला आलो मग 'गर्व से कहों हम हिंदू हैं'ची घोषणा द्यावी आणि कोणत्याही एखाद्या प्रदेशात या आरोळीला प्रतिसाद देणारे पुरेसे लोक असले की त्यांचा बऱ्यापैकी जयजयकारही होतो. आजकाल महाराष्ट्रात मराठीपणाचे खूळ आहे, त्याहीपलीकडे मराठापणाचेही खूळ आहे. कदाचित या मंडळींना आपला आपला समाज काही विवक्षित सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहतो आहे असे प्रामाणिकपणे वाटतही असेल, परंतु त्यावरील त्यांची उपाययोजना ही दुसऱ्याच्या पायावर पाय ठेवून त्याच्या हातातली भाकरी हिसकावून घेण्याची आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील सध्याची नोकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर आजमितीस रोजगारविनिमय केंद्रांमध्ये नोंद असलेल्या तरुणांनासुद्धा पन्नास ते शंभर वर्षांपर्यंत नोकरी मिळण्याची काहीही शक्यता नाही. सारी सरकार ही संस्थाच दिवाळखोर बनली आहे. त्यामुळे एकेकाळी 'शिका आणि नोकऱ्या करा' असा आदेश देणाऱ्या महान पुढाऱ्यांचेही सूत्र आता लागू पडणारे नाही.

 हिटलरच्या आयुष्यातील तरुणपणाचा कालखंड पाहिला तर तोंडाला फेस येईपर्यंत आवेशाने बोलणे, डोक्यावरील केसांचे झुबके वरखाली करणे आणि इतर सर्व समाजांतील लोकांना शिवीगाळ करणे हेच त्याचे तंत्र होते. आजचे पुढारी हेच हिटलरी तंत्र वापरतात. कोणत्याही एका समस्येला जबाबदार सगळा समाज नसून एक विवक्षित वर्ग आहे, अशी मांडणी हिटलरने करून ज्यू लोकांविरुद्धचा द्वेष जोपासला. तोच प्रकार आजही आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे. ज्यू समाज निदान अनेक क्षेत्रांत प्रगती करून बसलेला होता. बुद्धीच्या क्षेत्रापासून बँकिंग क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रे त्यांनी काबीज केली होती. ज्यूंविरुद्ध जोपासलेली विद्वेषाची भावना झोपडपट्टीत कसेबसे जीवन कंठणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथून आलेल्या लोकांना कितपत लागू पडेल याचा विचारही या नेत्यांच्या डोक्यात येत नाही. दिङ्मूढ झालेल्या समाजाच्या एका

राखेखालचे निखारे / ५०