पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




नेत्यांची उत्पत्ती काय?


 अंगारमळ्यात १९७७ मध्ये मी शेतीच्या कामाला सुरुवात केली. साहजिकच पहिले काम म्हणजे इतस्तत: पडलेले मोठमोठे दगड म्हणजे टोळ बाजूला काढणे. प्रत्येक वेळी एक दगड बाजूला केला की त्याच्याखालून एक नवे विश्व समोर येई. श्री समर्थ रामदासांनी एक टोळ फोडून आत जिवंत असलेल्या बेडकीचे दर्शन घडवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सर्व कामगारांचे पोशिंदे असल्याचा गर्वहरण केला होता, अशी एक कथा आहे. प्रत्येक वेळी दगड बाजूला केला की मला असेच अनुभवास येई. प्रत्येक दगडाखाली थोडीफार ओल शिल्लक राहिलेली असे आणि त्या ओलीच्या आसऱ्याने अनेक प्राणिमात्र जीव धरून राहिलेले असत. त्यात विंचू, साप, सापसुरळ्या, किडेकीटक, मोड आलेल्या बिया वगैरे दिसून येत. जवळजवळ सर्वच- जारज, अंडज, उद्भिज, स्वेदज विश्वाचे एक छोटेसे प्रदर्शन प्रत्येक दगडाखाली भरलेले असे. हे सारे प्राणी येथे आले कोठून, असा प्रश्न मला साहजिकच पडे.
 अलीकडे महाराष्ट्रात जी वेगवेगळी पुढारीमंडळी फिरत आहेत, जागोजागी सभा घेत आहेत त्यांच्याविषयी वाचल्यानंतर मला पुन्हा एकदा ही सारी मंडळी उपजली कोठून? असा प्रश्न पडतो. यांचे विश्व वेगळे, यांची भाषा वेगळी- अश्लाघ्य आणि प्रसंगी अर्वाच्यही. सर्वसाधारण माणसांच्या जगामध्ये ते पुढारी कोठेच बसत नाहीत. यांची उत्पत्ती काय, हा प्रश्न डार्विनला पडलेल्या प्रश्नाइतकाच गहण आहे.

 पुढाऱ्यांच्या उत्पत्तीचा सोपपत्तिक विचार करू गेले तर पुढाऱ्यांचा एक वर्ग असा आहे, की ज्या क्षेत्रात पुढे ते काम करतात किंवा त्यांचे पुढे नाव गाजते त्याच क्षेत्रात त्यांचा जन्म झालेला असतो आणि त्यांचे बालपण गेलेले असते. उदाहरणार्थ, जॉर्ज फर्नाडिस मोठे कामगार नेते. त्यांचा जन्म कामगार वस्तीत झाला आणि बालपणही तेथेच गेले. त्यामुळे त्यांना कामगारांच्या वास्तव परिस्थितीचा सहज अभ्यास करता आला हे खरे, पण कामगारांचे नेतृत्व

राखेखालचे निखारे / ४९