पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घटकाची भरपूर गर्दी जमते आणि टाळ्या मिळतात यातच त्या नेत्यांना समाधान आहे. शेतकरी संघटनेने जन्माच्या अपघाताने मिळालेल्या सर्व विचारसरणीवर 'क्षुद्रवाद' असा ठप्पा मारला आणि 'महाभारतातील कर्णाच्या शब्दांत 'दैवायत्तं कुले जन्मे: मदायत्तं तू पौरुषम' अशी मांडणी केली, पण सारे राष्ट्रच मुळी सरकारकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपांतील भिक्षांवर जोपासले जात असताना ही पौरुषाची भाषा कोणाला रुचणार?
  समर्थ रामदासांनी चळवळीच्या यशाचे एक मोठे मार्मिक गमक सांगून ठेवले आहे.
 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे
 परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे'
 समर्थांची ही उक्ती सध्याच्या परिस्थितीस कशी लागू पडते हे पाहू...
 प्रत्येक व्यक्तीस निसर्गाने एक संवेदनापटल दिले आहे. ते अध्यात्मात सांगितलेल्या आत्म्याचेच एक रूप आहे. वेदान्ताप्रमाणे हा आत्मा प्रत्येक व्यक्तीत म्हणजे पिंडातही असतो आणि सर्व ब्रह्मांडातही असतो. त्यामुळे व्यक्तिवादावर आधारलेल्या चळवळी खुल्या व्यवस्थेच्या चळवळी म्हणून यश पावल्या, ब्रह्मांडाची आण घेणारे मात्र हजारो वर्षे झाली तरी आपापल्या संस्था आणि प्रथा टिकवून आहेत, परंतु पिंड आणि ब्रह्मांड यांच्या मध्ये मराठापण किंवा मराठीपण असा काही थांबा नाही. म्हणजे मराठीपणाला किंवा मराठापणाला स्वयंभू आत्मा नाही तेथे भगवंताचे अधिष्ठान कोठून असणार? मग त्याकरिता चळवळी करून भडकावणारी भाषा वापरून, प्रसंगी अश्लाघ्य व अर्वाच्य विनोद करूनही मराठेपणाला किंवा मराठीपणाला भगवंताच्या अधिष्ठानाचे स्थान प्राप्त करून देण्याची सगळ्यांची धडपड सुरू आहे. पुढाऱ्यांनी असे प्रयत्न करावेत यात वावगे काहीच नाही. ज्याला त्याला त्याच्या मतीप्रमाणे जिथे भगवंताचे अधिष्ठान वाटेल तिथे तिथे तो आपले कार्यक्षेत्र निवडतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, यातील पुढाऱ्यांना भगवंताच्या अधिष्ठानाची जाणीव तर सोडाच, पण नेमकी याउलट विपरीत जाणीव झालेली दिसते. त्याची कारणे अनेक असू शकतात, कोणाला आपल्या हातून घडलेल्या एखाद्या गुन्ह्याचे प्रकरण लपवायचे असते, कोणाला आपल्या पूर्वायुष्यातील एखादा भाग लपवायचा असतो.

 याचे एक चांगले उदाहरण आहे. जगाचा इतिहास 'सिफिलिस' या आजाराने मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. हा लैंगिक आजार व त्याचे जंतू हळूहळू

राखेखालचे निखारे / ५१