पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/४४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योग्य पोटजातीचा असावा, त्याने कोणत्याही मार्गाने का होई ना, भरपूर पैसा कमावलेला असावा, आवश्यक तर काही गुंड वापरून मतदारसंघात स्वतःविषयी धाक तयार केलेला असावा असा आहे.
 या जागी आणखी एका मुद्द्याचा विचार करावयास पाहिजे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात 'आम आदमी'चा फार बोलबाला आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या समाजातील व धर्मातील लोकांना बंधुभावाने वागवावे असा भाईभाई वादाचाही सर्वमान्य शिष्टाचार आहे. या भाई-भाई वादाचा आणि महात्मा गांधींच्या आध्यात्मिक बंधुत्वाच्या संदेशाचा दुरान्वयानेही संबंध नाही. संपुआचा 'भाई-भाई'वाद हा निवडणूक जिंकून सत्तेवर टिकून राहण्याचा राजमार्ग आहे. याबद्दल मूळ पाप पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच पदरात घातले पाहिजे. माणूस अतिशय संवेदनशील. त्यामुळे कोठेही गेले की तेथील वातावरणाचा त्यांच्यावर त्वरित प्रभाव पडे. इंग्लंडमध्ये गेले, फेबियन सोशलिस्ट होऊन आले; रशियात गेले, स्टॅलिनचा प्रभाव घेऊन आले. इंग्लंडला असताना त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचे कामकाज पाहिले होते आणि त्याची चक्क कॉपी करून त्यांनी भारतातील निवडणुकीची व्यवस्था उभी केली. इंग्लंडप्रमाणे मतदारसंघ तयार झाले आणि प्रत्येक मतदारसंघात सर्वात जास्त मते मिळवणारा (First-past - the-post) निवडणुकीत विजयी ठरतो हाही नियम भारतात लागू झाला. त्या वेळच्या कागदोपत्री, सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्लंडमधील, घोड्यांच्या रेसमध्ये असतो तसा, First-past - the-post हा नियम आपल्याकडे लावला तर काय होईल याचे विदारक चित्र दिले होते. या पद्धतीमुळे बहुसंख्याकांपेक्षा कळप करून राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजांचे महत्त्व वाढेल आणि प्रत्यक्षात देशामध्ये बहुमत नसलेले पक्ष संसदेमध्ये मताधिक्य मिळवून येतील ही भीती स्वतः वल्लभभाई पटेल यांनी व्यक्त केली होती. फाळणीनंतरच्या अस्थिर स्थितीत देशाला स्थिर सरकार आवश्यक आहे असे स्वतःला समजावून वल्लभभाई पटेलांनी आपल्या मनातील शंका बाजूला ठेवली. संपुआचा 'भाई-भाई'वाद हा उच्च तात्त्विक भूमिकेवर आधारलेला नसून हे शुद्ध निवडणुकीच्या राजकारणाचे हत्यार आहे.

 मुळामध्ये भारतीय संसद लोकांचे प्रतिनिधित्व करतच नाही. भारत देश अनेक समाजांचा, अनेक समुदायांचा आणि अनेक मतामतांचा बनलेला आहे. त्या सर्वाचे प्रतिनिधित्व करणारी संसद निवडून यावी अशी इच्छा असेल तर त्याकरिता फ्रान्स किंवा जर्मनी या देशांत ज्या वेगवेगळ्या पद्धतींनी निवडणुका

राखेखालचे निखारे / ४७