पान:रससूत्र (Rasasutra).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मान्य करीत असताना दिसतो. तैत्तिरीय उपनिषदाच्या भाष्यात शंकराचायांनी मधुरतिक्तादी षडरसाना तृप्ती हेतू व आनंदकर असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे असे की ह्या जगात जो काही आनंद आहे त्या आनंदाचा भोक्ता आत्माच आहे, कारण आत्मा हा आनंद स्वरूप आहे. आणि आचार्यांचे हे म्हणणे तेत्तगियोपनिषदला धरुनच आहे. लौकिक जगात कोणत्याही कारणानं प्रतीत होणारा आनंद असो, त्याचा संबंध आत्म्याशी आहे ही वेदांताची प्रसिद्ध भूमिका आहे. योगशास्त्रही प्रतिभेमुळे दिव्यरसाचा आस्वाद मिळतो असे सांगताना रसास्वाद म्हणून ब्रह्मास्वादाचाच उल्लेख करीत आहे. ( योगसूत्र ३।३६ ) तैत्तिरियोपनिषदात तो आत्माच रस आहे असा उल्लेख आलेला आहे. त्याच्या प्राप्तीमळे आनंद होतो असाही उल्लेख आहे. (२७) खरी गोष्ट अशी आहे की वेदांत-परंपरेत प्रत्येकच आनंदाचा अनुभव हा आत्म्याचा आस्वाद आहे भर्तृहरीनेही असे म्हटले आहे की अहंतेचा छंद म्हणजेच ब्रह्मास्वाद.

 नाटयस्वाद अगर काव्यास्वाद आत्मानुभवासारखा असतो. कारण रस हा आत्मा आहे. हा आनंदाचा अनुभव आहे. कारण आत्मा आनंद-स्वरूप आहे. या कल्पना धार्मिक तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन काव्यशास्त्रात स्वीकारल्यामुळे प्रमाण होतात. यानंतर श्रुतिप्रामाण्य स्वीकारणा-या, कोणत्याही पुण्यवानाला आत्मा आणि रस ह्याचा वियोग घडवून आणता येत नाही. लोल्लट-शंकुकाचा पराभव ह्या ठिकाणी निर्णायकरीत्या होतो. ह्या जगातले सगळेच आनंद आत्म्याचे आहेत हे म्हटल्यानंतर आंबा खाणे आणि शाकुंतलाचा आस्वाद घेणे ह्यात फरक काय उरला? मागोमाग सगळे विवेचक हे सांगतच होते की नाटय म्हणजे सदवस्तू नव्हे. ते अनुकरण आहे. तेथील सुखदुःख लौकिक सुखदुःखासारखे नव्हे. भट्टनायकाने हा मुद्दा स्वीकारला आणि काव्यास्वाद अलौकिक मानला. वेदांत परंपरेत अलौकिक अनुभव निजत्व-निरसाचा असतो योग्याची योगसाधना, भक्तांची भक्तिसाधना, धार्मिकांची धर्मसाधना सर्वांचा हेतू देहाच्या ममत्वयबंधापासून सुटका करून घेणे हाच असतो. म्हणून नाट्यप्रतीती अलौकिक मानायची तर तीत निजत्वनिरास हा घटक अपरिहार्य ठरतो. आंबा खाणे आणि शाकुंतलाचा आस्वाद घेणे हयात मूलभूत फरक हा आहे. आंबा खाण्याचा अनुभव आहे. काव्यास्वाद हा निजत्वनिरासानंतरचा अनुभव आहे. हया ठिकाणी दुसरा प्रश्न उपस्थित होतो तो असा की जर नाट्यप्रतीती ही निजत्व-निरासानंतरची प्रतीती असेल तर योग्यांचा ब्रह्मास्वाद, मुक्तांची मुक्तावस्था व नाटयप्रतीती एकच समजायची काय? भट्टनायकाचे म्हणणे हे की ब्रम्हानंद काव्यानंद एकच नव्हेत, पण एकसारखे आहेत. दोन अनुभवांतील मुख्य फरक हा की ब्रह्मास्वादात अहंतेचा पूर्णच्छेद असून तो स्थिर अनुभव आहे. काव्यानंदात अहंतेच्या छेदाचा आरंभ असून तो अल्पकाल टिकणारा अनुभव आहे. निजत्वनिरास ही कल्पनासुद्धा धार्मिक तत्त्वज्ञानातून येते. ही कल्पना ज्याला स्वार्थ-निरपेक्ष अनुभव म्हणतो, त्याहून निराळी आहे.


८५