पान:रससूत्र (Rasasutra).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंगाचे बाबत गृहीत धरणे उचित नाही. शिवाय असे जातीबोध व सामन्याचे बोध व्यक्ति मनात संस्कार रूपाने असणार व त्याना व्यक्तीच्या अनुभवाची मर्यादा असणार,म्हणून कलांच्या व्यवहारात जे साधारणीकरण होते ते म्हणजे जातिबोध नव्हे. हे साधारणीकरण निजत्व निरासासह होणार आहे. “साधारणीकरण होत नाही" विधानाचा हा अर्थ भट्टनायकाच्या भूमिकेत चपखल बसणारा आहे. तो समजून घेतल्यास ह्याही मुद्दयावर अभिनवगुप्ताचे आक्षेप मूळ मुद्दा डावलणारे वाटू लागतात.
 अभिनवगुप्तांनी भट्टनायक जेथे साधारणीकरण होत नाही असे म्हणतो, तेथेही साधारणीकरण शक्य आहे व होत असते असे दाखविण्याचा प्रयत्न करून भट्टनायकाला चूक ठरविलेले आहे. अभिनवनुप्तांचे म्हणणे असे की प्रत्येक माणूस, अनंत जन्माच्या फेऱ्यातून आलेला आहे हे जन्मोजन्मीचे अनंत संस्कार प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे असाधारण, असामान्य वाटणाऱ्या घटनांशीसुद्धा माणूस समरस होऊ शकतो व त्यांचे साधारणीकरण होऊ शकते, कारण कोणत्यातरी जन्मी ह्या घटना घडल्यांचे संस्कार प्रत्येकाच्या मनात असतात. हा जन्मोजन्मीच्या संस्कारांचा मुद्दा काव्यचर्चेत किती महत्त्वाचा समजावा हा ज्याच्या त्याच्या धार्मिक भूमिकेचा भाग आहे. नाट्य व व्यवहारातील साधारणीकरण निजत्वनिरासासह होते, त्याविना होत नाही ह्या मुद्दयाचे खंडन अनंत जन्माचा हवाला असू शकणार नाही हे उघड आहे.
 भट्टनायकाचे म्हणणे असे की रस अनुभव, स्मृती, अनुमान इ. च्या पेक्षा विलक्षण आहे. रस भावकत्व व्यापाराने भावित होतो. काव्यात दोषाभाव, गुण अलंकारमयत्व हयांच्या योगाने व नाटकात चतुर्विध अभिनयामुळे हा भावकत्व व्यापार उत्पन्न होतो. रसाच्या भावित होण्याला निबिड निजमोह हे संकट असते. भावकत्व व्यापाराने निजमोह हया संकटाचे निवारण होते म्हणजे निजत्वाचा निरास व विभावादीचे साधारणीकरण होते. हा भावित झालेला रस भोग-व्यापाराने भोगला जातो. भोगव्यापार सत्व-रजतम हयांच्या अनुबंध-वैचित्र्यामुळे द्रुती विस्तार व विकास करणारा असतो. हया व्यापारात सत्त्वाचा उद्रेक असतो, संचितही प्रकाश, आनंद, विश्रांतीमय असते. हा रसभोग परब्रह्माच्या आस्वादासारखा असतो. अभिनवभारतीतील ह्या विवेचना प्रकाश टाकणारा भाग लोचन टीकेत आहे. लोचनानुसार भट्टनायक शब्दांचे तीन व्यापार मानतो. हे तिन्ही व्यापार नेहमीच शब्दांच्याकडून घडताना दिसत नाहीत. पण काव्यातील शब्द सामान्य शब्दांच्यापेक्षा निराळा असतो. हया शब्दाच्या ठिकाणी विचित्र अभिधा असते. हया अभिधेचा एक अंश वाच्यार्थ-प्रतीती करून देतो. हयातच गुण, अलंकारही आले. दुसरा रस भावित करतो. व साधारणीकरण करतो. तिसरा भोगव्यापाराचा आरंभ करतो. हा रसभोगच काव्यात महत्त्वाचा असतो. उपदेश आनुषंगिक असतो.
 भट्टनायकाचे हे रसविवेचन अनेक कारणांमळे महत्त्वाचे व अनेक प्रकारचे घोटाळे


८३