पान:रससूत्र (Rasasutra).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्त होत नाही; ह्या भाषेत सांगतो. अभिनवगुप्त, स्वतः सुद्धा रसानुभव हा निजत्व अवस्थेतील अनुभव आहे, असे समजत नाहीत. त्यांच्याही विवेचनात निजत्व-निरासाला फार मोठे महत्त्व आहे. निजत्व निरासानंतर येणारा अनुभव हा सुद्धा एक प्रकारची प्रतीती आहे. म्हणून रस प्रतीत होत नाही असे भट्टनायकाचे म्हणणे चूक आहे असा आक्षेप अभिनवगुप्त घेतात. हे अभिनवगुप्ताचे शब्दखंडन म्हटले पाहिजे. कारण भट्टनायकाचा आशय त्यांनी स्वीकारलेलाच आहे.
 अभिनवगुप्त म्हणतात, एक तर रस नित्य म्हणावा लागेल किंवा असत् म्हणावा लागेल. अगर तो अभिव्यक्त होतो असे म्हणावे लागेल. पैकी रस असत् असेल तर त्याचा भोगच शक्य नाही. रस नित्य असेल तर नाट्यप्रयोग असो-नसो, त्याची उपस्थिती ही मानावीच लागेल. ते शक्य नाही. रस नित्य अगर असत् दोन्ही नसल्यामुळे तो अभिव्यक्त होतो असे म्हणणे भाग आहे. सबब रस अभिव्यक्त होत नाही हे शब्दखंडनच म्हटले पाहिजे. कारण निजत्वासह अभिव्यक्ती नाही हा भट्टनायकाचा मुद्दा अभिनवगुप्तांना मान्य आहे.
 भट्टनायकाच्या ह्या विवेचनात साधारणीकरणाचा एक मुद्दा आलेला आहे. सीता इ. व्यक्ती देवता असल्यामुळे त्यांचे साधारणीकरण होत नाही. समुद्र उलंघनासारख प्रसंगच असामान्य असल्यामुळे त्याचं साधारणीकरण होत नाही. असा हा मुद्दा आहे. हा मुद्दा थोडासा घोटाळा निर्माण करणाराच आहे. स्वतः भट्टनायक साधारणीकरणाचा पुरस्कर्ता आहे. व ह्या ठिकाणी तो साधारणीकरणाला विरोध करीत आहे ह्यात संगती कशी लावावयाची? ह्याबारत दोन पर्याय समोर ठेवता येण्याजोगे आहेत. सीता इ. व्यक्ती देवता आहेत म्हणजे असामान्य आहेत. म्हणून त्यांचे साधारणीकरण होत नाही. कारण जे सामान्य आहे, नेहमी सर्वांच्या प्रत्ययाला येते, त्याचेच साधारणीकरण होत असते. हाच मुद्दा समुद्र उलंघनाला लागू आहे. ह्या पद्धतीने साधारणीकरणाचे स्पष्टीकरण करणे म्हणजे वेगळ्या पद्धतीने व्यक्तिबोध मावळतो व जातिसामान्याचा परिचय होतो, असे म्हणणे भाग आहे. सामान्य व साधारण हे अशावेळी जातिबोधक होतात. हा अर्थ भट्टनायकाला अभिप्रेत असू शकत नाही. कारण तो पुढे साधारणीकरण सांगणार आहे. त्यावेळी राम-सीता आदी सर्व विभावांचे साधारणीकरण सांगणार आहे. कारण साधारणीकरण, हा त्याच्या विवेचनात प्रमुख मुद्दा आहे. मग साधारणीकरण अशक्य आहे. ह्या विधानाचा अर्थ काय? मी ह्या विधानाचा जो अर्थ लावतो तो दुसरा पर्याय आहे. भट्टनायकाला असे म्हणावयाचे आहे की जोवर निजत्व शिल्लक आहे तोवर साधारणीकरण होणार म्हणजे काय होणार? सामान्य जातीचा बोध होणार, इतकेच मीमांसक ह्या जाती-बोधाला महत्त्वाचे स्थान देतात. त्यांच्यातील काहींच्या मते अभिधेने जातिबोध होतो. लक्षणेने व्यक्तिबोध होतो. वैय्याकरण ही शब्दाने सामान्याचा बोध होतो, असेच समजत. असे साधारणीकरण, असामान्य व्यक्ती व


८२